पालिकेच्या मंडयांना मिळणार मॉलचा लूक, एका मजल्यावर एकाच प्रकारच्या वस्तू-पदार्थांची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका मजल्यावर फक्त भाजीपाल्याची विक्री, एका मजल्यावर फक्त मासे, मटण, चिकनची विक्री तर एका मजल्यावर जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान अशा प्रकारे मॉलमधील व्यवस्थेप्रमाणे पालिकेच्या मंडयांना नवा लूक देण्यात येणार आहे. ग्राहक-व्यावसायिकांना जिने चढायचा त्रास होऊ नये म्हणून सरकते जिने, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधाही सुरू केल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी सांगितले.

मुंबईत पालिकेच्या 92 मंडया आहेत. यामध्ये 17 हजार 164 गाळेधारक आहेत. या मंडयांचा पालिकेच्या माध्यमातून पुनर्विकास करताना नवे स्वरूप देण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 17 मंडयांचा अत्याधुनिक पद्धतीने मॉलच्या स्वरूपात पुनर्विकास करण्यात येत आहे. यामध्ये मॉलप्रमाणे पार्पिंगची सुविधाही दिली जाणार आहे. नव्या कामात जोगेश्वरी येथील नवलकर मंडई, बोरिवली पश्चिम येथील बोरिवली मार्केटचे काम हाती घेतले आहे. याच धर्तीवर आगामी काळात सर्वच मंडयांचा पुनर्विकास होणार आहे. दरम्यान, पुनर्विकासातून वरळी येथील गावडे मार्केटसह वांद्रय़ाचे पाली मार्केट, घाटकोपरचे पंतनगर मार्केट आणि मुलुंड येथील संत जलजलाराम मार्केट आणि वाकोला मंडईचा विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास करून घेण्यात आला आहे.

‘नॉन निगोशिएबल’ची अट राहणार
सद्यस्थितीत पालिकेच्या मंडयांमध्ये सरसकट एकाच ठिकाणी सर्व पदार्थ, वस्तूंची विक्री केली जाते. या ठिकाणी मच्छी, मटण, चिकन, सुकी मच्छीही विकली असल्याने नाराजी व्यक्त केली जाते. एखाद्या वस्तूसाठी वरील मजल्यावर पिंवा गाळा शोधण्याचा मनस्ताप ग्राहकांना करावा लागतो.
ठराविक जागेसाठी व्यावसायिकांकडून अट्टहास धरला गेल्याने वाद होतात. हे टाळण्यासाठी मॉलच्या धर्तीवर सर्वच मंडयांचा पुनर्विकास होणार असून परवानाधारकांना गाळे वितरीत करण्यात येतील. यामध्ये गाळेधारकांना ‘नॉन निगोशिएबल’ची अट घातली जाईल.