
मुंबईतील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. एक कोटी डोस मिळाल्यानंतर प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे 454 व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यात येतील. सध्या पात्र असलेल्या 60 लाख नागरिकांचे 60 दिवसांत लसीकरण करण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले असले तरी काही दिवसांत लसींच्या तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. यासाठी पालिकेने मुंबईकरांसाठी एक कोटी डोसचा पुरवठा करण्यासाठी 12 मे रोजी ‘ग्लोबल’ टेंडर काढले आहे. याला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे पालिकेला लवकरच एक कोटी डोस मिळणार आहेत. हे डोस मिळाल्यानंतर वेगाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी व्हॅक्सिनेशन सेंटर वाढवण्यात येतील. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक ट्रेनिंग दिले जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक डोस प्राप्त झाल्यानंतर सरकारी, खासगी आस्थापने, सोसायटय़ांमध्ये लसीकरणाला सुरुवात होईल. यासाठी 125 खासगी रुग्णालयांना परवानगीही देण्यात आली आहे. तर पालिकेच्या 227 वॉर्डमध्ये केंद्रे सुरू होत आहेत. यामध्ये रेल्वे, मिलिटरी, आरसीएफ, एअरपोर्ट अशा सरकारी आस्थापनांमध्ये पालिकेकडून डोस दिले जातील. मात्र जर खासगीरीत्या लस देण्यात येत असल्यास संबंधितांना स्वतः लस घ्यावी लागेल. शिवाय खासगी रुग्णालये किंवा खासगीरीत्या लसीकरण कॅम्प आयोजित केल्यास सुरक्षा-खबरदारीच्या उपाययोजना संबंधितांना कराव्या लागतील.
दिवसाला एक लाख डोस देण्याचे नियोजन
- मुंबईत 18 वर्षांवरील पात्र असलेल्या 90 हजार ते एक लाख लाभार्थ्यांचे दिवसाला लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन आहे. यामध्ये आतापर्यंत 30 लाखांवर डोस देण्यात आले आहेत.
- आगामी काळात उर्वरित 60 लाख जणांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. शिवाय सुमारे 82 लाखांवर लाभार्थ्यांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसाला एक लाख डोस देण्याचे नियोजन सुरू आहे.
































































