बाप्पा पावला! गणेशोत्सव मंडळांना झटपट परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव मंडळांना पालिकेने या वर्षी ऑफलाइन परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे या वर्षी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून गतवर्षी परवानगी घेतलेल्यांना प्राधान्याने परवानगी देण्यात येणार आहे. 21 जुलैपर्यंत ऑफलाइन आणि त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मंडळांना ही परवानगी दिली जाणार आहे.

मुंबईत सुमारे 11 हजार गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील सुमारे 3500 मंडळे मंडप बांधून उत्सव साजरा करतात. या सर्व मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. यानुसार पालिकेने गणेशोत्सवासाठी परवानगी देतानाच कोरोना खबरदारी घेण्याचे आवाहन करूनच अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या हद्दीतील पालिकेच्या प्रभाग कार्यालयात ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. पालिकेच्या संकेतस्थळाचे काम 21 जुलैपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज करता येणार आहेत.

कोरोना खबरदारी घेण्याचे हमीपत्र द्यावे लागणार

मुंबईत कोरोना आटोक्यात आलेला असला तरी अजूनही दररोज सुमारे 500 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना खबरदारी घेऊनच उत्सव साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे परवानगी देतानाच कोरोना खबरदारी घेण्याबाबतचे ‘विशेष हमीपत्र’ मंडळांना देणे बंधनकारक राहणार आहे.

पोलीस, अग्निशमनच्या वेगळय़ा परवानगीची गरज नाही

पालिकेने मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना लागू केली आहे. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. मात्र यंदा अशा प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीच्या परवानगीच्या आधारे ऑनलाइनरीत्या ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. यासाठी गेल्या वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक देणे बंधनकारक राहणार आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने मुंबईतील गणेश चित्रशाळेत मूर्तिकामास वेग आला आहे. धारावीतील देवता कला केंद्रात टिशू पेपर ,वर्तमानपत्राचा लगदा,लाल चिकन माती आणि शाडूच्या मातींपासून बनविलेल्या गणेशमूर्तींवर नक्षीकाम करताना कारागीर.