
पालिकेने मालमत्ता कर थकबाकीचे 98 टक्के टार्गेट पूर्ण केले असून या वर्षभरात तब्बल 5 हजार 135 कोटी 43 लाखांची वसुली केली आहे. यामध्ये अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्रे-सांताक्रुझ पूर्वमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली असून टार्गेटपैकी आता केवळ 64 कोटी 57 लाख रुपयांची तूट आहे. थकबाकी वसुलीच्या या कामगिरीचे महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कौतुक केले आहे.
पालिकेचे मालमत्ता कर ही महसुलाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी 19 हजार कोटींवर पोहोचल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदारांविरोधात वेगाने कारवाई सुरू आहे. पालिकेने आर्थिक वर्ष 2020–2021 मध्ये 5 हजार 200 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यानुसार केलेल्या कारवाई जोरदार वसुली करण्यात आली आहे.
अशी झाली वसुली
कर थकवणाऱया थकबाकीदारांच्या मालमत्तेवर अटकावणीची कारवाई, जलजोडणी खंडित करणे, वाहने–वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करणे अशा कारवाया करण्यात आल्या. 31 मार्च 2021 पर्यंत एकूण पाच हजार 135.43 कोटी जमा झाले आहेत. 31 मार्च 2020 रोजी चार हजार 161 कोटी रुपये जमा झाले होते, अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली.
या विभागात सर्वाधिक वसुली
- के पूर्व अंधेरी पूर्व, जोगेश्वरी – 540.28 कोटी
- के पश्चिम अंधेरी प.,विलेपार्ले प. – 454.52
- एच पूर्व सांताक्रुझ, खार, वांद्रे पूर्व – 411.25
- जी दक्षिण वरळी – 399.29
- एस भांडुप – 303.68
































































