
वीज मीटर नसलेले शासकीय निवासस्थान जमा करून घेण्यासाठी केलेल्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी न काढण्यासाठी सुरक्षारक्षकाकडे 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना पालिकेच्या दोघा सुरक्षा अधिकाऱयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
जयकर (नाव बदललेले) हे माटुंगा येथील एफ/उत्तर कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांना वीज मीटर नसलेले शासकीय निवासस्थान देण्यात आले होते. हे निवासस्थान जमा करून घेण्यासाठी जयकर यांनी अर्ज केला होता. त्या अर्जात कोणतीही त्रुटी न काढण्यासाठी त्याच कार्यालयातील सहाय्यक सुरक्षा अधिकारी मधुकर निकाळजे (52) यांनी 15 हजारांची मागणी केली होती. परंतु जयकर यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तशी तक्रार दिली होती. जयकर यांच्या तक्रारीनंतर ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तपास केला असता त्यांना त्यात तथ्य आढळले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी जयकर यांच्याकडून 7 हजारांची लाच मधुकर निकाळजे यांनी घेऊन ती लाच सुरक्षा अधिकारी विजय जाधव यांच्याकडे दिली. पोलिसांनी दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
























































