मुलांमधील श्रवणदोष शोधणार डायल फॉर ध्वनी, जनजागृतीसाठी पालिकेच्या उद्यान विभागाचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवजात अर्भक आणि ताह्या मुलांमधील श्रवणदोष शोधण्यासाठी तसेच जनजागृती आणि उपचारांसाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे. विप्ला संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘डायल फॉर ध्वनी’ या हेल्पलाईनची पोस्टर्स महापालिकेच्या सर्व उद्यानात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे श्रवणदोष असलेल्या पालकांपर्यंत हा संदेश पोहोचून बालकांना वेळेत मदत आणि उपचार मिळणार आहे.

पालिकेचा उद्यान विभाग वृक्ष संगोपन आणि संवर्धनासाठी पुढाकार घेत असतो, मात्र त्याचबरोबर वाचनवेड वाढावे यासाठी ‘उद्यानपेटी’सारखे उपक्रमही राबवत असतो. त्यात आता सामाजिक बांधिलकीचीही भर पडली असून जन्मजात श्रवणदोष असलेल्या मुलांना वेळेत उपचार मिळून त्यांना इतर मुलांसारखे सर्वसामान्य आयुष्य जगता यावे यासाठीही पुढाकार घेतला आहे. मुंबईतील ‘डायल फॉर ध्वनी’ या संस्थेने श्रवणदोषाबद्दल जनजागृती व्हावी, मुलांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा आवाका वाढावा, लोकांमध्ये जनजागृती वाढावी यासाठी पालिकेने हेल्पलाईनचे पोस्टर सर्व उद्यानात लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मिस्ड कॉल द्या, मदत मिळवा!
‘डायल फोर ध्वनी’ या हेल्पलाईनचा नंबर 022-49393333 असा आहे. विप्ला संस्थेने ही हेल्पलाईन ऑल कार्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्या मदतीने ऑगस्ट 2022 मध्ये सुरू केली आहे. हा नंबर डायल करून केवळ मिस्ड कॉल द्यायचा आहे. आम्ही संबंधित पालक किंवा हितचिंतकाशी संपर्क करून पुढील सर्व जबाबदारी घेऊ, असा दावा संस्थेने केला आहे. मुलांमधील श्रवणदोषाचा शोध लागला तर त्याप्रमाणे मुलांवर पुढील उपचार करणे शक्य होईल.

मुंबई महापालिकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणाऱया व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी पालिका नेहमीच उभी राहिली आहे. जन्मजात श्रवणदोष असलेल्या मुलांना या हेल्पलाईनचा मोठा फायदा होणार आहे. मुलांबरोबर पालकही उद्यानात येत असल्यामुळे पालिका उद्यानात लावण्यात येणाऱया हेल्पलाईनच्या पोस्टर्समुळे पालकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. – जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका