
मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोना रुग्णांकडून ऑक्सिजनची मागणी वाढली असताना पालिकेने नेमलेला पुरवठादाराने 1200 पैकी केवळ 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवले आहेत. असे असताना पालिका प्रशासनाने संबंधित कॉण्ट्रक्टरवर कारवाई करण्याऐवजी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीत आज सदस्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. प्राणवायू पुरवठय़ात दिरंगाई करणाऱया पुरवठादाराला काळय़ा यादीत टाका, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत नव्या स्ट्रेनमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठय़ा प्रमाणात लागत आहे. देशभरात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे बळी जात असताना मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सक्षम ठेवल्यामुळे दुर्घटना घडलेली नाही. याच पार्श्वभूमीवर पालिकेने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढली होती. यासाठी पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने प्रतिसाद देत प्रत्येक मशीनसाठी 89 हजार 569 रुपये दराने 1200 मशीन्सचा पुरवठा करणे अपेक्षित होते. यामध्ये तीन वर्षांच्या हमी कालावधी आणि दोन वर्षांच्या देखभालीसह मशीन्सचा पुरवठा करावयाचा होता. यानुसार पुरवठादाराने केवळ 300 मशीन्सचा पुरवठा केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली आहे.
…नंतरच निविदा प्रक्रिया राबवा!
निविदेनुसार निवड झाली असताना पुरवठादार मनमानी करीत असेल तर त्याच्यावर प्रशासन कारवाई का करीत नाही, असा सवाल सदस्यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्यानंतरच नवी निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देशही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

























































