प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांना पालिकेकडून ‘टाळे’, अंधेरीत चार प्रकल्प केले ‘सील’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

मुंबईत धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने आतापर्यंत 763 प्रकल्पांवर ‘काम बंद’ कारवाई केली आहे. 3 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या या कारवाईत ‘स्टॉप वर्क’ कारवाईनंतरही दिलेल्या मुदतीत कार्यवाही केली नसल्याने आता ही बांधकामे ‘सील’ करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. यामध्ये पालिकेचा के/पूर्व अंधेरी विभागात चार बांधकामे ‘सील’ केली आहेत.

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. बांधकामांच्या ठिकाणाहून उडणाऱया धुळीमुळे प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता खालावत असल्याने पालिकेने बांधकाम प्रकल्पांना प्रदूषण रोखण्यासाठी 27 प्रकारचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच कंपाऊंड वॉल, प्रिंक्लर आणि डेब्रिजची वाहतूक बंदिस्तपणे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे, या नियमांच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी पालिकेने पोलीस कर्मचाऱयाचा समावेश असलेल्या पाच जणांच्या टीम नियुक्त करून सर्व 24 वॉर्डात कारवाई सुरू केली आहे.

अशी होतेय कार्यवाही

– पालिकेकडून 23 ऑक्टोबरपासून नवी नियमावली जारी करण्यात आली असून अंमलबजावणी करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. यानंतर 3 नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.

– रस्त्यावरील धूळदेखील प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे पालिकेकडून दररोज 450 किमी रस्त्यांवर टँकरने पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. यासाठी सद्यस्थितीत 24 वॉर्डसाठी सुमारे 150 टँकरच्या माध्यमातून रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यात येत असून लवकरच टँकर वाढवण्यात येणार आहेत.

550 बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांना ऑनलाइन नोटीस बजावून धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर कार्यवाही केली नसल्याने 550 बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आता बांधकाम ‘सील’ करण्याची कार्यवाही होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.