
तब्बल 67 प्रकारची 4 हजार झाडे असलेले मनमोहक हिरवेगार ‘नंदनवन’च पालिकेने मालाडमध्ये फुलवले आहे. अतिक्रमणातून भूखंड मोकळा करून तब्बल 25 हेक्टरहून अधिक जागेवर मालाड पश्चिमेला हे डॉ. एपीजे अब्दुल कलाम वन उद्यान निर्माण करण्यात आले आहे. पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापेक्षाही या उद्यानाचा विस्तार मोठा आहे.
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी अद्ययावत उद्याने, मैदाने निर्माण करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत पालिकेने 2013 मध्ये मालाडच्या या भूखंडावरील अतिक्रमण काढून तेथे उद्यान तयार करण्यास सुरुवात केली. मनोरंजन मैदान उद्यानाचे आरक्षण असलेल्या या भूखंडावर सुमारे 550 झोपडय़ा होत्या. त्यांच्यावर कारवाई करून 2013 मध्ये या झोपडय़ा महापालिकेने हटविल्या. हा भूखंड उंच सखल असल्याने तेथे उद्यान विकसित करणे आव्हान होते. मात्र पालिकेने योग्य पध्दतीने नियोजन करुन मुंबईत वन उद्यान साकारले आहे. या वन उद्यानात तब्बल 2 किलोमिटरचा लांबीचा पाथवेही तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जंगलासारखे रूप यावे यासाठी या ठिकाणी सिमेंट, डांबर अशा साहित्याचा वापर कमी करण्याकर भर दिला आहे.
असे आहे उद्यान
उद्यानात झाडांचे 5 किभाग तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने देशी झाडे लाकण्यात आली आहेत. कोणकणात आढळणारी झाडे, औषधी वनस्पती, समुद्र किनाऱया वरील झाडे, फळ, फुल झाडे, मोठी सावली देणारी अशी झाडे आहेत. त्यामुळे केवळ नागरिकांसाठी नव्हे तर हे वन उद्यान पक्षी आणि इतर जिवांसाठीही या उद्यानांचा आसरा ठरले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे. फुलपाखरे किटक आकर्षित व्ही या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात आले असून त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.
अभ्यासकांना संधी
पालिकेचे हे उद्यान पर्यटक लहान मुले, यांच्यासह पक्षी किटक यांच्यासाठी आकर्षण आहे. त्याच बरोबर आंबा, काजू, रतांब (कोकम), नारळ, सिताफळ जांभूळ अशा कोकणात आढळणाऱया झाडांसह झाडांसह समुद्रफुल सिल्व्हर ओक अशी किनाऱयावरील झाडे, कड पिंपळ अशी मोठी झाडे आणि रक्तचंदन, अर्जुन कडूलिंब अशा प्रकारची औषधी झाडेही आहेत. यामुळे उद्यानत पक्षी, किटकांचा वावर वाढल्याने अभ्यासकांनाही संधी मिळणार आहे.


























































