हजारो मॅनहोल्सवर संरक्षक झाकणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पावसाळय़ात आपत्कालीन परिस्थिती उद्भवून नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील १४२५ मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक झाकणे बसविण्यात आली असून समुद्रकिनाऱयांवर ३६ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत, तर मुंबईतील ६८८ धोकादायक इमारतींना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळय़ात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली.

२९ ऑगस्ट २०१७ रोजी बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दीपक टॉकीज येथे मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने हायकोर्टात केली होती. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून मुंबईतील किती मॅनहोलवर लोखंडी संरक्षक जाळय़ा बसवल्या त्याबाबत माहिती देण्याचे आदेश हायकोर्टाने पालिकेला गेल्या सुनावणीवेळी दिले होते. त्यानुसार आज महापालिकेच्या वतीने ऍड. अनिल साखरे यांनी शहरातील १४२५ मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक झाकणे बसविण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर मुंबईतील २९९ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून तेथील नागरिकांना त्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्याचे साखरे यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय सेवा आणि अन्न पुरविणार
गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत अतिवृष्टी झाल्याने अनेक वकील तसेच याचिकाकर्ते हायकोर्टात अडकून पडले होते, तर अन्नाअभावी नागरिकांचे हाल झाले होते. परंतु पालिकेने याबाबत कोर्टाला कोणतीही विचारणा केली नव्हती यावरून न्यायालयाने पालिकेला फटकारले होते. यावेळी अशा घटना घडू नयेत म्हणून पालिकेने मुंबईतील काही हॉटेल्स तसेच क्लिनिक सेंटरसोबत करार केला आहे. त्याचबरोबर झोपडपट्टी, रेल्वे स्थानक, बसस्थानक या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी स्वतः जाऊन अन्न पुरविणार आहेत.

पालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट अॅपद्वारे अतिवृष्टीची माहिती
अतिवृष्टीची माहिती मुंबईकरांना कळावी याकरिता पालिकेने विशेष मोबाईल ऍप तयार केले आहे. या मोबाईल अॅपद्वारे पावसाच्या स्थितीसह रेस्टॉरंट, राहण्याची व्यवस्था, बसस्टॅण्ड आणि इतर ठिकाणांबाबतची माहिती मिळणार आहे, असे ऍड. साखरे यांनी सांगितले.