
सामना ऑनलाईन । उरण
मत्स्य विभागातील अधिकाऱयांच्या ‘नांगर’ टाकलेल्या कारभाराने मुंबई, रायगडच्या समुद्रात सध्या परप्रांतीय मच्छीमारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, तामीळनाडू, कर्नाटकसह गुजरातमधील तब्बल पंधराशे बोटींनी घुसखोरी केली असून दररोज लाखो टन मासळीची लूट केली जात आहे. संतापजनक म्हणजे बंदी कायदा असतानाही सरकारी बाबूंच्या आशीर्वादाने ही घुसखोरी सुरू असल्याने मच्छीमारांमध्ये संतापाची ‘लाट’ उसळली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, केरळ, गुजरात आदी परराज्यातील सुमारे 1500 मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करत आहेत. राज्यातील बहुतांश मच्छीमार बोटी 200 हॉर्सपॉवर क्षमतेच्या आहेत. मात्र परप्रांतातून येणाऱया मच्छीमार बोटी 427 हॉर्सपॉवरपर्यंतच्या आहेत. अशा मोठय़ा हॉर्सपॉवर क्षमतेच्या बोटी अक्षरशः महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुडगूस घालत असून मुंबईचा समुद्रच खरवडून काढत आहेत. आधीच राज्यातील मच्छीमार व्यवसाय मासळीच्या दुष्काळामुळे पुरता कोलमडला असताना घुसखोरांवर कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
-परप्रांतीय मच्छीमार बोटी पकडलेली मासळीही मुंबईच्या ससून डॉक आणि कर्नाक बंदर (भाऊचा धक्का) येथे उतरून विक्री करतात. त्यामुळे आवक वाढल्याने मासळीचे भाव घसरत आहेत.
-एकाच परवान्यावर अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी मासळीचा व्यवसाय करत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांना शासकीय अधिकाऱयांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणाही धजावत नसल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे.



























































