कुडा येथील सिंचन विहीर प्रकरण; प्रशासन गाढ झोपेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । सेलू

तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना वादग्रस्त ठरली असली तरी या योजनेतून बोगस लाभार्थाांनाच अभय मिळाल्याचे परत एकदा दिसून येत आहे. तालुक्यातील कुडा येथील करपरा धरण क्षेत्रातील शासनाने संपादीत केलेल्या शेतजमिनीमध्येच मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर खोदली असल्याचे निवेदन पंढरी आदाबे यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना 14 फेब्रुवारी रोजी दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नामदेव आदाबे यांच्या नावे कुडा (ता. सेलू) येथे गट.न. 41 मध्ये 3 हेक्टर 31आर एवढी शेतजमीन होती. ती जमीन करपरा धरणा क्षेत्रासाठी शासनाने संपादीत केली होती. मात्र शासकीय जमिनीवर गोविंद नारायण कांदे व रामेश्वर कांदे या दोघांनी कब्जा करुन मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम केले आहे. दोघांनी त्यांचे गट न. 42 ची सातबारा दाखवून शासकीय शेतजमिन गट. नं. 41 मध्ये सदरील सिंचन विहीरीचे खोदकाम केले आहे. हे अत्यंत चुकीचे असून त्यांनी मनरेगा योजनेरंर्गत अकुशल अनुदानाचे बिलेही उचलली आहेत. तसेच सदरील व्यक्तींनी त्यांच्या आईच्या नावे गट.न. 43 मध्ये विहीर खोदकाम न करता गट.न. 41 मधील विहीर दाखवून मनरेगाचे अनुदान लाटले आहे. शासकीय जमिनीवर कब्जा करुन शासकीय योजनेचा लाभ सदरील लाभार्थ्यांनी उचलून शासनाची दिशाभूल केली असून लाभार्थ्यांबरोबरच अधिकारी कर्मचारी ही या सर्व प्रकारास तेवढेच जबाबदार असून दोषींवर योग्य कारवाही करुन संबधित लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.