
डॉक्टरकीची पदवी नसतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या पाच मुन्नाभाईंना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा डोस दिला. स्वप्नकुमार मंडल, रामकुमार माताप्रसाद मिश्रा, शोएब मोहम्मद अघारिया, तुकाराम थोरात, शेख अजीज अशी त्या पाच जणांची नावे असून त्यांच्या विरोधात जुहू, ओशिवरा आणि मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-9 चे वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने जुहू आणि ओशिवरा येथे बनावट रुग्ण पाठवून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला. विलेपार्लेच्या नेहरूनगरमधून स्वप्नकुमार मंडल आणि रामकुमार मिश्रा तर ओशिवरा येथून शोएब मोहम्मद अघारियाला ताब्यात घेतले. फसवणूकप्रकरणी त्या तिघांविरोधात जुहू आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्वप्नकुमार आणि रामकुमारविरोधात पाच वर्षांपूर्वी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर दुसरी कारवाई युनिट-11 चे प्रभारी निरीक्षक चिमाजी आढाव आणि युनिट-12 चे पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या पथकाने मालवणी येथे केली. कारवाईकरिता दोन पथके तयार करण्यात आली. मार्वे रोड आणि मालवणी परिसरात दवाखाने थाटून बसलेल्या तुकाराम थोरात आणि शेख अजीजला ताब्यात घेतले. त्या दोघांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी शेखविरोधात मालवणी पोलिसांनी कारवाई करून औषधे, वैद्यकीय उपकरणे जप्त केली आहेत. त्या पाचही जणांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही.
गोरेगावमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तरुणी पुरविणाऱ्या दोन मॉडेल्सना<span
…



























































