कारेगाव येथे मुन्नाभाई एमबीबीएस जेरबंद; बनावट नाव-बनावट पदवी वापरून डॉक्टरचा व्यवसाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे, बनावट नाव आणि एमबीबीएसचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून, गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हा भामटा कोविड रुग्णांवर उपचार करत होता. या रुग्णालयातील 23 रुग्णांना अन्यत्र उपचारासाठी हलविण्यात आले.

महेमुद फारुक शेख (रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, कारेगाव, ता. शिरूर. जि. पुणे मूळ गाव पीर बुऱ्हाणनगर, नांदेड) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. शेख हा महेश पाटील या बनावट नावाने वैद्यकीय व्यवसाय करत होता. याबाबत डॉ. शीतलकुमार राम पाडवी यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथे फिर्याद दिली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार शेख हा बनावट नाव व बनावट पदवी लावून श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. वरिष्ठांना त्यांनी ही माहिती दिली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी त्याची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे शिवाजी ननावरे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड दत्तात्रय, तांबे जनार्दन शेळके, पोलीस नाईक विजय कांचन, गुरू जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ या पथकाने कारेगाव येथे जाऊन श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या शेख याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर श्री मोरया हॉस्पिटल चालवणारा शेख हा बनावट नाव, तर एमबीबीएस बनावट प्रमाणपत्र तयार करून त्या प्रमाणपत्राआधारे कारेगाव येथे श्री मोरया हॉस्पिटल नावाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल टाकून दोन वर्षांपासून रुग्णांवर उपचार करून रुग्णांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले.

त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन येथे ताब्यात दिले आहे. शेख याने बनावट शिक्के व बनावट आधार कार्ड बनवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहे.

कोविड रुग्णांना हलविले

श्री मोरया मल्टिस्पेशालिटी या हॉस्पिटलमध्ये एकूण 23 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यांना आता दुसरीकडे उपचारासाठी पाठवण्यात येत आहे, असे शिरूरचे प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.