बॉलीवूड आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

anil-deshmukh

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा शोध घेण्यासाठी एनसीबीकडून सिने कलाकारांची चौकशी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही बॉलीवूड आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनची तपासणी करावी अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र काँग्रेसच्या तक्रारीवर एनसीबीकडून कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. याची गंभीर दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असून एनसीबीने पुढील चार ते पाच दिवसांत तपास सुरू न केल्यास महाराष्ट्र पोलीस या कनेक्शनचा तपास करतील, अशी माहिती दिली आहे.

भाजप नेत्यांच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्यात यावी मागणीसाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आज दुसऱयांदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, सचिन सावंत यांनी केलेली तक्रार एनसीबीकडे याआधीच पाठविण्यात आली होती. मात्र एनसीबी याचा तपास का करत नाही? ते पुणाच्या दबावाखाली आहेत का, हा प्रश्न आहे. आता काँग्रेसची दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत. जर या तक्रारीनंतरही एनसीबीने तपास सुरू केला नाही तर महाराष्ट्र पोलीस याचा तपास करतील, असे देशमुख यांनी सांगितले.

एनसीबीकडून आता कुणाचीही चौकशी नाही
एनसीबीकडून सध्या कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार नसल्याचे समजते. आतापर्यंत झालेली चौकशी तसेच तपासाचे पुनरावलोकन करण्यात येत असून यासाठी एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना दिल्लीत परतले आहेत. परतण्याआधी तपास करीत असलेल्या दिल्ली आणि मुंबईच्या टीमकडून त्यांनी अहवाल घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरावे देऊनही एनसीबीचा तपास नाही – सचिन सावंत
भाजपच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे हे राज्य सरकारतर्फे गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते. परंतु या माहितीची एनसीबीने अद्याप चौकशी केलेली नाही. ड्रग्ज कनेक्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती, परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही, अशी माहिती सचिन सावंत यांनी यावेळी दिली.

बंगळुरू पोलीस मुंबईत येऊन तपास करतात मग एनसीबी का करीत नाही?
ड्रग्ज कनेक्शनशी संबंधित संदीप सिंह तसेच मागील निवडणुकीतील भाजपचे स्ट्रार प्रचारक विवेक ऑबेरॉय यांचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध तसेच ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. विवेक ऑबेरॉय हे नरेंद्र मोदी बायोपिकचे निर्माते आणि कलाकार आहेत. बंगळुरू पोलीस मुंबईत येऊन विवेक ऑबेरॉयची चौकशी करतात, मग एनसीबी तपास का करत नाही, असा सवाल देशमुख यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या