
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या प्रमोशनच्या नावाखाली दिग्दर्शकाची 45 लाख रुपयांची फसवणूक करणाऱया तिघांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांनी अटक केली. रजतकुमार मौर्या, संजय साह आणि राज सलोहा अशी त्या तिघांची नावे आहेत.
तक्रारदार हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांना रजतने मेसेज केला होता. त्यानंतर रजत, संजय आणि राजने मिळून त्यांना एक चित्रपट तयार करण्यास सांगितला. तसेच त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनसाठी परवानगी मिळाली आहे अशा भूलथापा मारल्या. प्रमोशनच्या नावाखाली त्या तिघांनी दिग्दर्शकाकडून 45 लाख रुपये उकळले. मे महिन्यात दिग्दर्शक हे एका ओटीटी चित्रपट प्रदर्शित करणाऱया कंपनीत गेले. त्याने चित्रपटाच्या प्रमोशनचे पत्र दाखवले. ते पत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी दिग्दर्शकाने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांना रजतची माहिती मिळाली. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी संजय आणि राजला अटक केली. या प्रकरणात एक महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.




























































