
सध्या बहुभाषिक सिनेमांचा ट्रेंड आहे. म्हणजेच एकाच वेळी हिंदी भाषेसह तमीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांत सिनेमांची निर्मिती करायची आणि जास्तीत जास्त नफा मिळवायचा. सिनेमांचे बजेट दिवसागणिक वाढत चालले आहे. त्यामुळे अर्थकारण जुळवण्यासाठी हा मार्ग फिल्ममेकर्सनी निवडलेला आहे. यातूनच साऊथ आणि हिंदी इंडस्ट्रीत देवाणघेवाण वाढलेली दिसून येत आहे.
कलाकारांची सरमिसळ
तमीळ सिनेमांचे निर्माता, डिस्ट्रीब्युटर एस.आर. प्रभू सांगतात, आमची रणनीती खूप साधी आहे. आम्ही कलाकारांचे मिक्सअप करतो. म्हणजे काही भूमिकेत साऊथच्या कलाकारांना घेतो, तर काही भूमिकांसाठी हिंदीचे कलाकार निवडतो. कधी कधी हिंदीचा प्रोडय़ुसर आणि साऊथचा डायरेक्टर असं मिक्सिंग करतो. त्यामुळे दोन्हीकडच्या कलाकारांना फायदा होत आहे. त्यांचे दोन्ही बाजूने फॅन बेस वाढत आहेत.
हे आहेत मोठे प्रोजेक्ट
सध्या अर्ध्या डझनहून अधिक सिनेमा अनेक भाषांमध्ये तयार होत आहेत. यात आरआरआर, आदिपुरुष, राधे-श्याम, हाथी मेरे साथी, लाईगर, केजीएफ-2, मडी आदींचा समावेश आहे.
तसं बघितलं तर सिनेमांची देवाणघेवाण जुनीच आहे. सदमा, रोजा, अप्पू राजा असे सिनेमा आधी फक्त साऊथमध्ये होते. मात्र तिथे सुपरहिट झाल्यावर ते हिंदीत डब करण्यात आले. मात्र सध्या प्रोजेक्टची घोषणा करतानाच हिंदीसह अन्य किती भाषांत रिलीज होणार हे सांगितले जाते.
‘बाहुबली’च्या दोन्ही सिनेमांना यश मिळाल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे. बाहुबलीमुळे साऊथच्या फिल्ममेकर्सला समजून चुकलंय की हिंदी भाषेत सिनेमा रिलीज करण्यात मोठा फायदा असतो, असे साऊथ इंडस्ट्रीचे ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी सांगितले. दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील प्रेक्षकांची आवड भिन्न आहे. उत्तरेत आयुष्मान खुराणाचा जोनर मल्टिप्लेक्समध्ये चालून जातो, तर दक्षिणेत सिंगल स्क्रीन हाऊसफुल करणारा हिरो लागतो. उत्तर प्रदेश, बिहार येथील छोटय़ा भागांत अॅक्शन फिल्मना प्रेक्षक आहे. त्यामुळे बहुभाषिक सिनेमा अॅक्शन ओरिएंटेड लागतात, असे बाला म्हणाले.



























































