अभिनेत्याला अश्लील इशारे करत शिवीगाळ! मुंबई पोलिसांना ट्विट करत मदतीसाठी साद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता कुणाल खेमू आणि त्याच्या कुटुंबासोबत रविवारी धक्कादायक प्रकार घडला आहे. ती घटना सांगत कुणालने मुंबई पोलिसांना मदतीसाठी साद घातली आहे. कुणालने ट्विटरवर गाडीचा फोटो शेअर करत आपल्यासोबत नेमकं काय झालं तेही लिहिले आहे.

अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान बॉलीवूडमध्ये  प्रसिद्ध असून ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. मात्र, रविवारी त्यांनी सोशल मीडियावर मांडलेला विषय आणि शेअर केलेला फोटो वेगळा होता. हा फोटो शेअर करत कुणालने मुंबई पोलिसांना मदतीसाठी साद घातली आहे. ट्विटरच्या माध्यमातून माहिती देत रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पत्नी सोहा, मुलगी इहाना, शेजारी आणि त्यांच्या दोन मुली आम्ही ब्रेकफास्टसाठी जूहूला जात होतो. त्यावेळी एकजण वेगाने गाडी चालवत होता. मागून तो सतत हॉर्न वाजवत होता आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. मागून वेगाने माझ्या गाडीसमोर त्याची गाडी उभी केली.


अचानक मध्येच गाडी उभी केल्याने स्वत:बरोबर आमचाही जीव धोक्यात घातला. मी वेळीच अपघात होऊ नये म्हणून ब्रेक दाबला. पण त्यावेळी गाडीत असलेल्या मुलांसाठी तो भयंकर धक्का होता. त्या व्यक्तीने गाडीतून बाहेर येत आम्हाला अश्लील हातवारे करत शिवीगाळ केली आणि हे सगळं रेकॉर्ड करण्यासाठी जेव्हा मी फोन हातात घेतला तोपर्यंत तो त्याच्या गाडीत जाऊन बसला आणि गाडी वेगाने घेऊन गेला. त्यामुळे मुंबई पोलिसांना विनंती करतो की याप्रकरणात लक्ष देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करावी असे त्याने ट्विट केले होते.

मुंबई पोलिसांचे मानले आभार

मुंबई पोलिसांनी कुणाल खेमूच्या ट्विटला लगेच प्रतिसाद दिला. सांताक्रुझ ट्रॅफिक डिव्हीजनला याप्रकरणी कारवाई करण्याबाबत माहिती दिली आहे. यावर कुणाल खेमूने मुंबई पोलिसांचे आभार मानले.