रिचा सांगणार सामान्य लोकांच्या असामान्य कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटात बॉलिवूड कलाकार आपापल्या परीने मदतीचा हात देत आहेत. कुणी आर्थिक मदत करत आहे तर कुणी वैद्यकीय साधने उपलब्ध करून देत आहे. अशातच अभिनेत्री रिचा चढ्ढा हीदेखील पुढे सरसावली आहे. तिने एक हटके उपक्रम सुरू केला आहे. कोरोना काळात असामान्य कामगिरी करणाऱया सामान्य लोकांचे मनोबल वाढवण्याचा निर्धार तिने केलाय. त्यासाठी तिने ‘द किंडरी’ नावाचे इन्स्टाग्राम पेज सुरू केले आहे. त्या पेजच्या माध्यमातून वास्तविक जीवनातील खऱया हिरोंच्या कहाण्या ती आपल्याला सांगणार आहे.

सध्याच्या संकटात लोक आपापसातील मतभेद विसरून एकमेकांच्या मदतीला धावत आहेत. लोकांचे प्रेम, त्यांच्यातील एकात्मतेची भावना, आशावाद घेऊन रिचा चाहत्यांसमोर येणार आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहे. त्यांचे फोटो आणि कहाण्या ‘द किंडरी’ या पेजवर शेअर करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता आणणे, हा रिचाचा उद्देश आहे. ‘द किंडरी’ पेजवर खऱया हिरोंसोबत ती संवादही साधणार आहे.

याविषयी रिचा सांगते, हा एक लहानसा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून ‘कम्युनिटी’ उभी करायची आहे किंवा असलेली ‘कम्युनिटी’ मजबूत करायची आहे. आपण बघतोय की सामान्य लोक दिवसरात्र काम करत आहेत. ज्या व्यक्तींना ते कधी भेटलेले नाहीत त्यांच्यासाठी बेड्स, ऑक्सिजन, औषधे आदी सेवा देत आहेत. माणुसकीचे दर्शन पावलोपावली घडत आहे… अशा सर्व हिरोंना माझा सलाम!