
कुर्ला परिसरात भरधाव वेगाने बेस्ट बस चालवून नऊ पादचाऱ्यांना चिरडणाऱ्या बसचालक संजय मोरेला अखेर वर्षभरानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मोरेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या अर्जावर न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने निर्णय दिला. चालकाने निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तथापि, आरोपी मागील 15 महिन्यांपासून तुरुंगात आहे. खटल्यात 96 साक्षीदार असल्याने सुनावणीला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे, असे निरिक्षण नोंदवत न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी बसचालक मोरेला जामीनावर सोडण्याचे आदेश दिले.
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ 9 डिसेंबर 2024 रोजी चालक संजय मोरे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवरील ताबा सुटला. अनियंत्रित बसने पादचारी आणि रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 37 जण जखमी झाले. याशिवाय 22 वाहनांचे नुकसान झाले होते. याआधी मोरे याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने संजय मोरे याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचे योग्य प्रशिक्षण मिळाले नव्हते. कराराप्रमाणे सात दिवसांचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक होते, मात्र मोरेला केवळ तीन दिवस पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच, फॉरेन्सिक रिपोर्टनुसार अपघाताच्या वेळी चालक नशेत नव्हता. यामुळे हे प्रकरण सदोष मनुष्यवधाचे नसून निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूचे आहे, असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अद्वैत शुक्ला, नीतू सिंग आणि अमनदीप सिंग स्रा यांनी न्यायालयात केला. सरकारी पक्षाने याला विरोध केला.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत हे प्रकरण निष्काळजीपणाचे वाटते असे नमूद करत आरोपीचा तुरुंगातील कालावधी, साक्षीदारांची संख्या पाहता सुनावणीला लागणारा कालावधी या बाबी विचारात घेत न्यायालयाने संजय मोरेला जामीन मंजूर केला.



























































