
कौटुंबिक अत्याचाराच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीला कपडे आणि जेवणावरून टोमणे मारणे ही क्रूरता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत पती आणि सासरच्यांना निर्दोष मुक्त केले. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
जेव्हा संबंध बिघडतात तेव्हा आरोप करताना राईचा पर्वत केला जातो. जर लग्नाआधीच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या असतील आणि आरोप सामान्य असतील तर आयपीसी कलम 498अ अंतर्गत ते गंभीर मानले जाऊ शकत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबाला खटल्याला सामोरे जाणे हा कायद्याचा गैरवापर आहे, असेही न्यायालयाने सुनावले.
सदर जोडप्याचा 24 मार्च 2022 रोजी विवाह झाला होता. महिलेचे हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या दीड महिन्याच्या आत पती आणि सासरच्यांकडून अत्याचार सुरू झाला. तसेच पतीच्या मानसिक आणि शारीरिक आजार लपवून ठेवल्याचा आरोप पत्नीने केला होता. मात्र दोघांमधील विवाहापूर्वी झालेल्या चॅटमधून पतीने त्याचा आजार आणि घेत असलेल्या औषधांबाबत माहिती दिल्याचे आढळून आले. लग्नापूर्वी महिलेला तिच्या पतीच्या आजाराची माहिती होती असे न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच दिवाळीच्या सुमारास फ्लॅट खरेदी करण्यासाठी पतीने 15 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही पत्नीने केला होता. परंतु पतीकडे आधीच स्वतःचा फ्लॅट असल्याने न्यायालयाने त्यावर शंका व्यक्त केली. कुटुंबातील सदस्यांवर लावण्यात आलेले आरोप सामान्य स्वरूपाचे होते, जे कलम ४९८-अ अंतर्गत क्रूरता मानता येणार नाही, असे असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पती आणि सासरच्यांविरोधात दाखल एफआयआर आणि फौजदारी कारवाई रद्द केली.