संदर्भासाठी उपयुक्त पुस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मल्हार कृष्ण गोखले

मराठी साहित्यातले ख्यातनाम आणि लोकप्रिय लेखक व्यंकटेश माडगुळकर स्वतः निसर्ग अभ्यासकदेखील होते. ते लेखनात आणि व्याख्यानात अनेकदा जॉर्ज शेल्लरचे उदाहरण देत असत. जॉर्ज शेल्लर हा जर्मन-अमेरिकन प्राणी संशोधक आहे. टांझानियातल्या सेरेनगेटी जंगलात, वन्य प्राण्यांचा अभ्यास केला. त्यावर ग्रंथ लिहिले. त्याचे वैशिष्ट्य असे की, एखाद्या विषयावर लिहिताना तो दोन ग्रंथ लिहितो. पहिला ग्रंथ हा त्या विषयातील शास्त्र्ाज्ञ, तज्ञ, अभ्यासक यांच्यासाठी असतो. म्हणजेच तो पूर्णपणे शास्त्रीय परिभाषेत असतो. तर त्याच विषयावरचा दुसरा ग्रंथ हा सर्वसामान्य वाचकांसाठी अगदी साध्या, सोप्या आणि सुंदर, प्रवाही भाषेत लिहिलेला असतो. यामुळे शेल्लरचा अभ्यास, निरीक्षणे ही वैज्ञानिकांपर्यंतही पोचतात आणि सर्वसामान्यांपर्यंतही पोचतात.

प्रस्तुत ‘1965 चा विजय’, ‘धगधगत्या समिधा’ आणि ‘धर्मनिष्ठ सावरकर’ या तीन पुस्तकांचे लेखन सर्वसामान्यांसाठी आहे. 1965 सालचे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध, त्यातील हिंदुस्थानी जवानांची अपूर्व मर्दुमकी, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे खंबीर नेतृत्व या विषयावर मोठे ग्रंथ आहेत. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला अधिकृत ग्रंथही आहेच. पण सामान्य माणसाला या युद्धाची चटकन माहिती मिळेल, पत्रकार, लेखक, वक्ते यांना लेख किंवा भाषणासाठी तयार सामग्री ज्यातून मिळेल, अशा पुस्तकाची गरज होती. प्रस्तुत ‘1965चा विजय’ या प्रवाही भाषेतील पुस्तकाने ती पूर्ण केली आहे. बिग्रेडियर हेमंत महाजन यांची मार्मिक प्रस्तावना पन्नास वर्षांपूर्वीच्या या विजयाचे आजचे महत्त्व समजावून देते.

दुसरे पुस्तक आहे क्रांतिकारकांची माहिती देणारे. क्रांतिकारक म्हटले की, लोकांना साधारणपणे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद एवढीच नावे माहीत असतात. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी हे त्यांच्या संघटनेचे नाव आणि या सैन्यातले इतर देशभक्तीने रसरसलेले सैनिक यांची माहिती क्वचितच असते. महिला सबलीकरण वगैरे गप्पा आपल्याकडे पुष्कळ चालतात. पण दुर्गाभाभी वोहरा या अत्यंत शूर आणि उत्तम नेमबाज अशा क्रांतिकारक महिलेची माहिती कुणालाही नसते. अशा अनेक ज्ञात-अज्ञात स्त्री-पुरुष देशभक्तांनी आपल्या जीवनाच्या समिधा देशाच्या स्वातंत्र्यासाठी चेतवलेल्या रणकुंडात बेधडक अर्पण केल्या होत्या. त्यांची अद्ययावत माहिती ‘धगधगत्या समिधा’ या पुस्तकात आली आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या उत्कृष्ट प्रस्तावनेने या क्रांतिकारकांच्या कार्याचे आजचे प्रयोजन विशद केले आहे.

तिसरे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धर्मविषयक विचारांबद्दल चिंतन करणारे आहे. आधुनिक काळात स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघा महान तत्त्वचिंतकांनी हिंदू धर्म, त्याचे तत्त्वज्ञान आणि एकंदरच संपूर्ण जगातील तत्त्वचिंतनाची परखड चिकित्सा केली आहे. हे करताना त्यांनी हिंदू धर्मातल्या सर्वोच्च तत्त्वांचा जितका जोरदार पुरस्कार केला आहे. तितकीच हिंदू धर्मातल्या दोषांवर टीकेची झोड उठवलेली आहे. अलीकडे सावरकरांची बदनामी करणारे कथित निधर्मी लेखक त्यांच्या चिंतनातील हा भागच संदर्भ मोडूनतोडून वापरत असतात. प्रस्तुत ‘धर्मनिष्ठ सावरकर’ या पुस्तकात सावरकरांची धर्मनिष्ठा, राष्ट्रकारण, ईश्वरचिंतन, विज्ञाननिष्ठा याबाबत सखोल चिंतन मांडले आहे. धर्मनिष्ठ माणूस हा विज्ञाननिष्ठ कसा असू शकेल? किंवा विज्ञाननिष्ठ माणूस धर्मावर निष्ठा कशी ठेवू शकेल? धर्म आणि विज्ञान हे परस्परविरुद्ध आहेत, अशीच अलीकडे सामान्य माणसाची धारणा झालेली आहे.

परंतु या दोन्ही गोष्टी अजिबात परस्परविरोधी नाहीत, हे सावरकरांनी कसे दाखवून दिले आहे, याची अतिशय सोप्या भाषेत मांडणी येथे लेखकाने केली आहे. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांची सुंदर वैचारिक प्रस्तावना म्हणजे सोन्याला सुगंध ठरली आहे. अशा रीतीने मोठे विषय, झटपट संदर्भासाठी उपयुक्त ठरतील अशा स्वरूपात मांडण्याचे आणि तसे करताना त्यांचे मूळ वजन कमी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे अवघड काम लेखक दुर्गेश परूळकर यांनी उत्तमरीतीने पार पाडले आहे.

1965 चा विजय, धगधगत्या समिधा,

धर्मनिष्ठ सावरकर

तिन्ही पुस्तकांचे लेखक ः दुर्गेश परुळकर

प्रकाशक ः सोहम् क्रिएशन ऍण्ड पब्लिकेशन

पृष्ठs अनुक्रमे ः 80, 248, 128

मूल्य अनुक्रमे  ः रुपये 100/-, 250/-, 150/-,