
>> स्वप्नसौरभ खोत
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नव्हे, तर संबंध हिंदुस्थानच्या ठायी असलेली साहसी वृत्ती आणि पौरुष जागं करणारे अद्वितीय सिंहपुरुष होते. वेगवेगळ्या शाह्यांशी, प्रसंगी आप्तस्वकीय व स्वधर्मीयांशीही झुंज घेतली आणि सर्वधर्मीय प्रजेला एका सूत्रात गोवत सहिष्णू अशा हिंदुपदपातशाहीची स्थापना केली, अष्टावधानी व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवाजी राजांची युद्धनीती, नेतृत्व गुणवैशिष्ट्ये आणि प्रशासनावरील पकड यावर विपुल लेखन झालेलं असलं तरी सहज-सोप्या ग्रंथाची जी आवश्यकता होती ती ‘जयतु शिवाजी’ने पूर्ण केली आहे, असे नमूद करावेसे वाटते.
हिंदुस्थानी लष्करात उच्चपदस्थ सेनाधिकारी राहिलेल्या मेज. जन. शशिकांत पित्रे यांनी या ग्रंथाची सुरेख रचना केली आहे. शिवाजी राजांचं लष्करी नेतृत्व आणि सामरिक संदर्भातली बुद्धिमत्ता मांडण्याचं कार्य लष्कर आणि युद्धाभ्यासाचे तांत्रिक पैलू हाताळत नेतृत्व केलेल्या अनुभवी सेनाधिकाऱ्याने व तितक्याच उत्तम लेखकाने करावं हा अत्यंत अनुपम योग आहे. हिंदुस्थानी संस्कृतीतल्या सद्सदविवेक युद्ध पद्धतीची मुस्लिम आक्रमकांनी केलेली वाताहत, त्यामागील मूलभूत कारणं याबाबतची विस्तृत मांडणी या ग्रंथात आहे.
पूर्वीच्या प्रजादक्ष व सहिष्णू राज्यांकडून शिवाजी राजांनी प्रेरणा घेतलीच, परंतु युद्धतंत्रात गरजेचे आणि प्रभावी बदल करत एकाच वेळी अनेक पातशाह्यांना नामोहरम करून सोडलं. गनिमी कावा, हेरगिरी, कूटनीती आणि प्रसंगी प्रत्यक्ष छापे घालून आपल्या नेतृत्वाची जरब निर्माण केली. अफजल खान युद्धकाल, पन्हाळगड व शाईस्तेखान युद्धकाल व बसरूर, जंजिरा आणि दक्षिण दिग्विजय या मोहिमांचं यथोचित व विस्तृत लष्करी विश्लेषण या ग्रंथाद्वारे लक्षात येतं. मुळात आक्रमकांना चतुराईने राज्य सीमेवर किंवा शत्रूराज्यातच झुंजत ठेवून आपला प्रांत सुरक्षित ठेवण्याचं महाराजांचं धोरण अनेक गोष्टी शिकवणारं आहे. शिवाजी राजे अनेक विद्यांमध्ये पारंगत होते. योजनांचे निर्माते होते आणि लोकांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेची उत्तम जाण त्यांना होती. त्यांच्या कर्तृत्वाचं तेज व चारित्र्य हे प्रभाकराप्रमाणे तळपणारं होतं आणि हिंदुस्थानी संस्कृती, संत परंपरा यांचं अधिष्ठान त्यांच्या कार्यामागे होतं. या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार सरदार, सेनानी निर्माण झाले. प्रत्यक्ष आघाडीवर उभं राहून नेतृत्व करताना अफजल खानाशी भेट, लाल महालावरील छापा किंवा आग्य्राच्या कराल दाढेतून बुद्धिचातुर्याने निसटणं याबाबतच्या योजना, नकाशे आणि घटनांची विश्लेषणं ही अत्यंत सूक्ष्म पद्धतीने या ग्रंथात वाचायला मिळतात. रवींद्रनाथ टागोरांनी बंगालमधील शिवाजी उत्सवाकरिता लिहिलेली कविता शिवाजी राजांचं अगदी यथोचित वर्णन करते.
शिवाजी महाराज आणि त्यांचं जीवनरहस्य हा संयत अभ्यासाचा व अमलात आणण्याचा प्रचंड मोठा विषय आहे. मराठा साम्राज्याच्या सामाजिक, आर्थिक व वैचारिक भरभराटीमागे शिवाजी महाराजांनी निर्मिलेला व दीर्घकाळाकरिता सुसंगत ठरेल असा सामरिक विचार आहे याचा राष्ट्राला विसर पडू नये म्हणून ‘जयतु शिवाजी’सारख्या ग्रंथांची निर्मिती आवश्यक आहे हे निश्चित!
जयतु शिवाजी
लेखक : मेज. जन. शशिकांत पित्रे (निवृत्त)
प्रकाशक : राजहंस प्रकाशन



























































