स्त्री शिक्षण चळवळीचे वारसदार

43

>> मलिका अमरशेख

मानसगंध प्रकाशनतर्फे झालेलं हे छोटेखानी पुस्तक. पण आभाळभर उंचीची माणसं यात सामावणं शक्यच नव्हतं. त्यांचं कर्तृत्व, त्यांची थक्क करणारी झेप, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 10-15 नव्हे, तब्बल दोन हजार महिलांना पदवीधर करण्याचं उत्तुंग कार्य ज्या सरळसाध्या तत्त्वनिष्ठ व समाजाचं ऋण फेडणं हेच ध्येय आहे असं मानून जीवन सार्थ करणारं दांपत्य म्हणजे आचार्य माधवराव पोतदार व त्यांच्या अर्धांगी मनीषा पोतदार!

‘ध्येय आणि ध्यास’ असं या पुस्तकाचं नाव सार्थ ठरवणाऱया या जोडप्याचा प्रवास सुरेश पोतदार यांनी वर्णन केलाय. माधवराव यांचा प्रवास बहिःस्थ विद्यार्थी व शिक्षक एवढाच नसून तो उत्तम चित्रकार, नकलाकार, भजनी बुवा, काव्यछंद ही अनेक रूपं. उत्कृष्ट अध्यापक हा तर त्यांचा रायगड जिल्हाभर झालेला लौकिक आहे. पत्रकारिता, संगीत, गायन, अध्यापन, वक्तृत्व, काव्यलेखन अशा अनेक क्षेत्रांतील त्यांची भरारी स्वयंसिद्ध अशीच आहे. म्हणून समीक्षक रा. भि. जोशी त्यांना ‘एकलव्य’ म्हणत. 10 माध्यामिक शाळांची त्यांनी जिल्हय़ाच्या दक्षिण भागात उभारणी केली.

डॉ. पोतदार यांची जिल्हय़ात कुणीही न केलेली महिला शिक्षणाची वाटचाल सुरू झाली. या महिला नोकरी करणाऱया होत्या, गृहिणी होत्या. त्यात काही विधवाही होत्या. या सर्व दोन हजार स्त्रियांना पदवीधर करून एक चमत्कार घडवला. चार-पाच इयत्ता शिकलेल्या गावातील महिलांना पदवीधर करणं सामान्य गोष्ट नव्हती. त्यातून या महिला पोलादपूर खोऱयापासून मुरूडपर्यंतच्या होत्या. अलिबाग, पनवेल, उरण येथील आगरी, माळी, भंडारी, दलित, चर्मकार, कासार, तेली, गुजर, मारवाडी अशा विविध जातीजमातीतील होत्या.

विशेष म्हणजे हे महत्कार्य हाती घेण्याआधी त्यांनी प्रथम पत्नीला सुशिक्षित केलं. त्या फक्त एसएससी होत्या. पण शिक्षणाची ओढ होती. डॉ. माधवरावांनी आग्रहाने त्यांना एम.ए. करायला लावलेच! पुढे तर त्यांनी नाटककार भास्कर गिरधारी यांच्या समग्र साहित्यावर पीएचडी मिळवली. त्यानंतर दोघांनी संपूर्ण रायगड जिल्हय़ातल्या स्त्र्ायांच्या आयुष्यात क्रांतीच घडवली.

आजपर्यंत 140 पुस्तकांचे लेखन त्यांनी केलं. खरोखरच आज ‘खेडय़ाकडे चला’ असं सांगावं लागणाऱया परिस्थितीत त्यांनी खेडय़ात राहून स्त्र्ायांना साक्षर केलं! आज शहरात मराठी शाळा बंद होत आहेत अन् ही आम्हाला शरमेची गोष्ट वाटत नाही. रिक्षा ड्रायव्हर ते झोपडीत राहणारी धुणीभांडी करणारी स्त्र्ााrही आपल्या मुलाला इंग्लिश शाळेत घालू इच्छिते. पण त्यांचं अनुदान, ऍडमिशन फी अवाच्या सवा. मुलांचं भलं व्हावं म्हणून हे लोक इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टहास करतात. जेव्हा की, माधवराव व मनीषाताईंनी पदरचे पैसे खर्च करून या अशिक्षित गावच्या बायकांना साक्षरच नव्हे तर एम.ए.ही केलं! आपली मुळं या दांपत्याला समजली, जी शहरातल्यांना नाही समजली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा आत्ताचा नारा, पण तो त्यांनी 1968 पासूनच चालू केलेला यज्ञ आहे. ग्रामीण भागात शिक्षण द्यावं ही या दोघांची कल्पना, पण त्यासाठी माधवरावांना पाच वर्षे विनावेतन काम करावं लागलं, त्याबरोबर बीएचं वर्षही गमवावं लागलं. जो सगळय़ा शहरी व गावकीतल्या लोकांनी अंजन घालून वाचावा असा आहे. मनीषाताईंच्या बीएच्या पहिल्या वर्षांसाठी पुणे गाठावं लागत होतं. छोटा पराग लहान दुधावरच. ते दूध गरम करण्यासाठी स्टोव्ह बरोबर, भांडीही सोबत. परागला माधवरावांच्या ताब्यात दुधाच्या बाटलीसकट देऊन मनीषाबाई पेपर देत होत्या. मुलांसाठी वेळ द्यायचा तर अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. तेव्हा माधवरावांनीच युक्ती काढली. टेपरेकॉर्डर आणला न् व्याख्याने टेप करणे चालू केले. त्याचं मनन चिंतन करायचे. (ही त्यावेळची गोष्ट आणि तेही नवरा करतोय! आहात कुठे?). मनीषाताई पण ग्रेटच! एकीकडे चपात्या लाटायच्या, मुलांचे करायचे, टेपवरचे भाषण ऐकायचे, ध्यानात ठेवायचे आणि परीक्षा द्यायची.

त्यांनी एम.ए. पूर्ण केले. एक स्त्र्ााr समर्थपणे घडली न् त्यांनी अनेकींना घडवलं! ज्यावेळी महिलांच्या बहिःस्थ शिक्षणाचं कार्य सुरू केलं तेव्हा नोंदणीची संख्याच मुळी 105पर्यंत पोहोचली होती. यावरूनच स्त्र्ायांना शिक्षणाची ओढ किती होती हे स्पष्ट होतं. स्त्र्ााrशिक्षणासंबंधित त्यांच्या कार्याने एक चळवळ उभी राहिली. स्त्र्ायांसमोर सक्षमतेचा एक नवा आलेख उभा राहिला.

या दोघांनी महर्षी कर्वे व महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्याच कार्याचा यज्ञयाग पुढे चालवला. यात अनेक समस्या आल्या. ते दोघंही खंबीर असल्यानेच दूर झाल्या. गृहिणी या खेडय़ातल्याच होत्या, पण ज्या शिक्षिका होत्या त्यांनाही बँकेतून चेक कसा काढतात हे माहीत नव्हते!

शेतकऱयांच्या आत्महत्येचा प्रश्न मराठवाडय़ात पेटला. त्याच मराठवाडय़ातल्या विधवा बायकांनी जिवंत राहून मरण भोगलं मात्र आपल्या मुलांना दोन घास खाऊ घालण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ही सारी स्त्र्ायांचीच उदाहरणं. डॉ. पोतदार पती-पत्नींनी अशी अनक उदाहरणं उभी केली. यासाठी ते कुठेही कमी पडले नाहहीत. डॉ. पोतदार पती-पत्नी जिथे अपुरा पैस पडत होता तिथे घरातला पैसा खर्च करत होते.

एफवायबीएचे वर्ग शनिवार, रविवार खोपोली, पेण येथे सुरू होते. परीक्षेसाठी फॉर्मही भरले गेले. पण त्या वर्षी पेण गावातल्या सगळय़ाच शिक्षण संस्था बोर्डाने ताब्यात घेतल्या. आता प्रश्न आला तो डेस्कचा. रिकाम्या खोल्या देण्याचे प्राचार्यांनी मान्य केलं. आता पुन्हा दोघांनी आव्हान पेललं. दोन ट्रक भाडय़ाने घेतले आणि वरसई, रामवाडी येथील डेस्क आणून स्वतः मनीषाताईंनी ते काम पूर्ण केलं.

शिक्षण क्षेत्रातले आदर्श ना. जगन्नाथ शंकरशेट, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे व शाहूराजे यांच्यानंतर याच दांपत्यांची नावं अभिमानानं घ्यावी लागतील असे त्यांचे कार्य आहे!

डॉ. पोतदार यांनी टीवायबीएचे वर्ग घराजवळच्या पडवीत सुरू केले. विद्यापीठाची माणसं येत. पाहून थक्क होत. ज्या लेखकांची पुस्तके परीक्षेस लावली होती ते लेखकच डॉ. पोतदार विद्यार्थ्यांपुढे आणत होते. त्यांची व्याख्याने ठेवत होते. विद्यार्थिंनींना तर पोतदार निवास हक्काचेच वाटत होते. काही शेकडय़ांत मुली पदवीधर झाल्या, ज्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की, आपण पदवीधर होऊ. यातही अनेक विरोधक आडवे आले. साधारणतः स्मरणिका पैसा मिळवण्यासाठी काढतात, पण बुद्धिभेद नको म्हणून पैन्पैचा हिशेब देण्यासाठी स्मरणिका काढली. त्यासाठी कुणाची जाहिरातही मिळवली नाही. जिवलग मित्र शाहीर अमरशेखांचे कार्यक्रम गावोगावी, शाळा-कॉलेजच्या मदतीसाठी व्हायचे. तीच मदत त्यांनी आपल्या जिवलग मित्राला केली व प्रेम करणारे अनेक सुहृद. यात अनेक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचे अत्यंत मनस्वी हृद्य पत्रे आहेत.

फक्त फोटो व मांडणी अधिक स्पष्ट व कलात्मक झाली असती तर – तसेच शीर्षक व मुखपृष्ठ रुक्ष आहे. ते अधिक याहून समर्पक करता आले असते. पण आतली तत्त्वनिष्ठ उंच माणसं इतकी सोन्या रत्नाच्या खजिन्यागत व सूर्यही फिका पडावा अशा कर्तृत्वाची आहेत. त्यापुढे या उणिवा काहीच नव्हेत!

आपली प्रतिक्रिया द्या