
>> अर्चना मिरजकर
बाराव्या शतकात मराठी साहित्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आणि गेल्या आठशे वर्षांत एक समृद्ध साहित्य परंपरा मराठी भाषेत निर्माण झाली. त्यातील महत्त्वाच्या शंभर पुस्तकांची ओळख या पाक्षिक सदराद्वारे आपण करून घेणार आहोत. हे सदर दृश्य स्वरूपात यूटय़ूबच्या ASMT (https://bit.ly/ 3mQWqHD) या चॅनेलवरही उपलब्ध आहे.
संत ज्ञानेश्वरांनी 1290 साली ज्ञानेश्वरी लिहिली. तेव्हा महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती अतिशय कर्मठ होती. वेद आणि उपनिषदांत सांगितलेले ज्ञान संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य माणसांना उपलब्ध नव्हते. कर्मकांडे आणि आचारविचारांचे कडक नियम हेच आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे अशी समजूत पसरली होती, तेव्हा सर्वसामान्य जनतेला भगवद्गीतेत सांगितलेले तत्त्वज्ञान समजावून देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले तो ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’. हे भाष्य त्यांनी अतिशय सुंदर, ओघवत्या भाषेत, लोकांना मनापासून आवडेल अशा प्रासादिक ओव्यांच्या रूपात केले आहे.
ज्ञानेश्वर स्वतः सिद्ध योगी होते. आत्मस्वरूपाचे ज्ञान आणि समाधी अवस्था त्यांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे गीतेवर केलेले त्यांचे भाष्य हे केवळ ऐकीव उपदेशावर आधारित नसून स्वानुभवातून उतरलेले निरूपण आहे. तरीदेखील केवळ तपस्व्यांना समजेल असा रुक्ष उपदेश न करता ज्ञानेश्वर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून गीतेचं रहस्य उलगडून दाखवतात. त्यासाठी ते नित्याच्या जीवनातील उदाहरणे देतात, आप्तसंबंधांचे दृष्टांत देतात आणि सर्वसामान्य माणसाला पडणारे प्रश्न उमजून अनेक उपमा आणि प्रतिमांद्वारे तत्त्वज्ञान समजावून सांगतात.
उदाहरणार्थ, आपल्या शरीरावरच बुद्धी केंद्रित केल्यामुळे मनुष्य आपले आत्मस्वरूप कसे ओळखत नाही हे स्पष्ट करताना ते म्हणतातः
का कवण एकू भ्रमलेपणे ।
मी तो नव्हेगा चोरलो म्हणे ।।
ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे ।।
घेउनी ठाके ।।
एरव्ही होय ते तोचि आहे ।
परी कायी कीजे बुद्धि तैशी नोहे ।।
देखा स्वप्नींचेनि घाये ।
की मरे साचे ।।
एखादा वेडा ‘‘मी तो पूर्वीचा माणूस नाही, तो चोरला गेला’’ अशी समजूत करून घेऊन बसला तरी वस्तुस्थिती अशी असते की, तो तीच व्यक्ती आहे किंवा स्वप्नात झालेल्या शस्त्राच्या वारामुळे कुणी मरत नाही त्याप्रमाणे ‘शरीर म्हणजेच मी’ अशी जरी माणसाची समजूत असली तरी सत्य तसे नसते. मराठी भाषेचे ज्ञानदेवांना अतिशय कौतुक होते. ते म्हणतातः
‘‘माझ्या मराठीची बोलू कौतुके ।
परी अमृतांतेंहि पैजा जिंके ।।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।।’’
या कविहृदय असलेल्या योग्याचे अंतःकरण अतियश प्रेमळ आहे. त्यांच्या निरूपणात जीवनातील विविध नातेसंबंधांचे, पशुपक्ष्यांचे दृष्टांत येतात.
परतत्त्व समजावून देण्यासाठी केलेले शांत रसप्रधान काव्य आणि त्याला असलेला भावनेचा ओलावा यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ म्हणजे जणू दुधात साखर. ज्ञानेश्वर म्हणतातः
‘‘सहजे मलयानिलु सुगंधु ।
तया अमृताचा होय स्वादु ।।
आणि तेथेचि जोडे नादु । जरी दैवगत्या ।।
तरी स्पर्श सर्वांग निववी । स्वादे जिव्हेते नाचवी ?
तेवींचि कानांकरवी । म्हणवी बापू माझा ।।’’
जणू मलय पर्वतावरील सुगंधित वारा वाहतो आहे आणि देवाच्या कृपेने त्याला अमृताची चव आणि मधुर नाद प्राप्त व्हावा; तर तो आपल्या सर्वांगाचा शीण घालवेल. जिव्हा आणि कान तृप्त करेल. वाचणाऱयाचे मन शांत आणि इंद्रिये तृप्त करणारं असं ज्ञानदेवांचे काव्य आहे. त्यांच्या कवित्वाचं लेणं लेऊन मुळातच अलौकिक विषय असणारं हे काव्य सर्वार्थाने दिव्य झालं आहे.
‘ज्ञानेश्वरी’मध्ये कृष्णार्जुनाच्या संवादामधून ज्ञानदेव अतिशय सुंदर रीतीने पारमार्थिक जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान सांगतात. अर्जुनावरच्या प्रेमामुळे मोठमोठय़ा योग्यांना दुर्लभ असलेले ज्ञान श्रीकृष्ण कसा त्याला सांगत आहे याचे वर्णन ज्ञानेश्वर अतिशय सुंदर करतातः
‘जे न संगेचि पितया वसुदेवासी ।
जे न संगेचि माते देवकीसी ।।
जे न संगेचि बळीभद्रासी ।
ते गुह्य अर्जुनेशी बोलत ।।
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक ।
तेही न देखे या प्रेमाचे सुख ।।
आजि कृष्णस्नेहाचे पिक ।
यातेंचि आथी ।।’’
पुढे याच चौथ्या अध्यायात भगवंताच्या ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ या प्रसिद्ध वचनावर टीका करताना ज्ञानेश्वर म्हणतात –
“ते वेळी आपुल्याचेनि कैवारे ।
मी साकारू होऊन अवतरे ?
मग अज्ञानाचे आंधारे । गिळूनी घाली ।।
अधर्माची अवधी तोडी ।
दोषांची लिहिली फाडी ।।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।
दैत्यांची कुळे नाशी ।
साधूंचा मानु गिंवशी ।।
धर्मांसी नीतीशी । शेंज भरी ।।
ऐसेया काजालागी । अवतरे मी युगी युगी ।।
परि हेचि वोळखे जो जगी । तो विवेकिया ।।
परमेश्वराच्या अवताराचं केवढं सुंदर दृश्य वर्णन केलं आहे. तत्त्वज्ञानासारखा गहन विषयदेखील आपल्या वाणीच्या रसाळपणामुळे ज्ञानेश्वर असा सुखात्मक करतात.
जवळ जवळ तीस पिढय़ांपूर्वी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ची भाषा थोडी वेगळी वाटली तरी ती मराठीच आहे. लक्षपूर्वक वाचलं तर अर्थ लक्षात येतोच. पुनः पुन्हा वाचलं की, त्यातील सौंदर्यस्थळंही लक्षात येतात. हळूहळू ओवीच्या छंदाची गोडी लागते आणि मग सातशे वर्षांपूर्वी होऊन गेलेले, वयाच्या सोळाव्या वर्षी ब्रह्मज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर आणि आपण यांच्यातले अंतर संपुष्टात येते. आपण प्रत्यक्ष नेवासे येथील शंकराच्या मंदिरात त्यांच्यासमोर बसून त्यांचे निरूपण ऐकतो आहोत असे वाटू लागते आणि आतापर्यंत आपण या अमृताच्या समुद्रापासून या सोन्याच्या खाणीपासून दूर कसे राहिलो याचे आश्चर्य वाटू लागते.
‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे. ज्यांना थोडी सोपी सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’तल्या निवडक 365 ओव्यांची दैनंदिन ‘ज्ञानेश्वरी’ही उपलब्ध आहे. पुढच्या लेखात आपण चर्चा करू मराठीतील आद्य गद्य ग्रंथाविषयी. तोपर्यंत वाचत रहा.































































