अन्यान्य मनोवृत्तींचे आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता दामले

‘प्रतिबिंब’ हा आसावरी फडणीस यांच्या अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या व पारितोषिकप्राप्त कथांचा संग्रह आहे. या छोटय़ा – छोटय़ा गोष्टींमध्ये आसावरीताईंनी वेगवेगळे विषय हाताळले आहेत. आसावरीताई या हाडाच्या शिक्षिका असल्याने शिक्षिकांच्या विविध मनोभूमिकांमध्ये यशस्वीपणे विहार करतात.

सानेबाईंच्या माजी विद्यार्थ्यांनी साजऱया केलेल्या एकसष्टीच्या सोहळ्याचा प्रसंग जितका आपल्याला भावतो, तितकेच रजूचे विकीबद्दलचे आंधळे पुत्रप्रेम खुपते. रंजनाला आपल्या करीअरिस्ट जन्मदात्रीबद्दल वाटणारा तिरस्कार जरी पटला तरी डॉ. उज्ज्वला शृंगारपुरे यांची व्यक्तिरेखा मात्र पटत नाही. ‘रिव्हर्स मॉर्टगेज,’ ‘कुलदीपक’ किंवा ‘घर की मुर्गी’ या कथा वास्तवाला अतिशय धरून आहेत.

‘दानत’ आणि ‘कणव’ या दोन्ही कथा देण्यासंबंधीच आहेत, पण कणवमधील मास्तरांची खंत आणि दानतमधल्या जतीनचा दिलखुलासपणा यांचा पोत भिन्न आहे. अनंतरावांना आलेली उद्विग्नता घेणाऱ्यांनी एक वेगळीच बाजू दाखवते, तर जतीनचा सच्चेपणा माणसे ओळखण्याची कला शिकवतो. जीवनात माणसांची पारख किती महत्त्वाची आहे यावर या दोन्ही कथा भाष्य करतात.

‘अनर्थ’ आणि ‘सावली’ या दोन्ही कथा ग्रामीण आणि नागरी संस्कृतीमधील स्त्री जीवनावर प्रकाश टाकतात. ‘सावली’ची पत्ररूप शैली वैशिष्टय़पूर्ण असून दीर, मुलगा व मुलगी यांच्या विद्या पाठारे हिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी अगदी सुयोग्य साधली आहे. ‘अनर्थ’ मात्र मनावर मोठा चरा आणते. खेळ नियतीचा मधील मनोरमा वाळुंज यांच्या भाग्याला मिळालेली कलाटणी पाहिल्यावर मनुष्य केवळ नियतीच्या हातचे बाहुले असल्याचा प्रत्यय पुनश्च येतो. ‘धर्मांतर’ ही कथा वास्तववादी आणि घटनाप्रधान असून विचारप्रवर्तकही आहे. आसावरी फडणीस यांच्या ‘प्रतिबिंब’मधील लघुकथा काही आधुनिक, काही जुनाट विचार, उदार आणि संकुचित मनोवृत्ती, त्यागी आणि ढोंगी व्यक्तिरेखा व वास्तववादी आणि अविश्वसनीय प्रसंग तितक्याच परिणामकारकतेने रंगवितात.