
>> अस्मिता येंडे
लेखिका वसुंधरा घाणेकर यांचा ‘पांढरा गुलमोहर’ हा तिसरा कथासंग्रह असून जुन्या परंपरांसोबतच काळाशी सुसंगत असलेल्या परिवर्तनशील वैचारिक भूमिकेला स्वीकारणारा आहे. जुन्या रूढी, परंपरा रुजवल्या गेल्या, त्यामागील हेतू मानवी उत्कर्षाचा असेल, पण त्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगताना या परंपरांचे पारडे अधिकच जड होऊ लागले तर कुठेतरी मोकळा श्वास घेणे गरजेचे आहे, हीच वैचारिक मोकळीक, स्व-अस्तित्वाची जाणीव करून देणाऱया या कथा आहेत.
‘पांढरा गुलमोहर’ या कथासंग्रहात एकूण 9 कथा समाविष्ट असून या दीर्घकथा आहेत. कथानक, त्यातील पात्रे, त्यांच्या भूमिका, दोन विचारांमधील द्वंद्व, कथेची आकर्षक मांडणी, सहजसोपी निवेदन शैली आणि प्रत्येक कथेतून विचारांचे बदलते प्रवाह अगदी संयमित शब्दांत मांडणं ही या कथासंग्रहाची वैशिष्टय़े आहेत. मुख्यत: स्त्राr- पुरुष नात्यांमधील वेगळा दृष्टिकोन, त्यातील बदललेल्या अपेक्षा, भावनिक तोल, त्यासोबतच प्रत्यक्ष जीवनातील चढउतार आणि एक माणूस म्हणून आधी स्वतकडे सकारात्मकतेने पाहण्याची वृत्ती, हे संवेदनशील तितकेच प्रामाणिक रंग या कथांच्या माध्यमातून लेखिकेने चितारले आहेत.
या कथा वाचताना लेखिकेच्या विचारांची विस्तृत कक्षा लक्षात येते. आपल्या परंपरा जपत असताना नावीन्यतेची कास धरली पाहिजे. तरुण पिढीची या सामाजिक रूढींकडे पाहण्याची दृष्टी, सोबतच जुन्या संस्कारांमध्ये वाढलेल्या पिढीला वाटणारी काळजी हे सगळे स्वाभाविक आहे, पण रूढी-परंपरांच्या भीतीपोटी जेव्हा भावनांचा बंध अडवला जातो आणि मग मोठे पाऊल उचलावे लागते. गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे नात्यांमध्ये संवादाची कवाडे सतत उघडी असावीत आणि काळानुसार होणारे परिवर्तन स्वीकारले पाहिजे हा भाव लेखिकेच्या प्रांजळ लेखणीतून तरलपणे उतरला आहे.
सोनाली घरच्या जबाबदाऱया सांभाळून नोकरी करणारी गृहिणी आणि आईसुद्धा. स्वामिनीच्या ऑफिसमध्ये काम करणारी ही सोनाली, पण तिला पाण्यात पाहणाऱया स्वामिनीने टाकलेले फासे कसे उलटे पडतात, हाच चढउताराचा खेळ दाखवणारी ‘सापशिडी’ ही कथा आहे. जुन्या परंपरांमध्ये वाढलेल्या माईंना आणि नानांना परदेशी असलेल्या आपला नातू गौरवच्या येण्याची आस असते, पण त्याच्या ठायी असलेल्या जाणिवेचे, वेगळेपणाचे सत्य माई आणि संपूर्ण कुटुंब कसे स्वीकारते, तसेच ‘पांढरा गुलमोहर’ ही प्रतिमा याच कथेतून खूप संवेदनशीलपणे अधोरेखित केली आहे.
‘आधुनिकोत्तर काळात समस्या आणि व्यथांचे स्वरूप बदलत आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडत राहणार. ते या कथांमध्ये जाणवते. सूक्ष्म निरीक्षण आणि चित्रदर्शी शैली यामुळे या समस्याप्रधान कथा परिणामकारक उतरल्या आहेत. शिवाय समस्यांचा परिहार करणारा शेवट आशादायी आहे…’ अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी कथासंग्रहाविषयी आपले मत व्यक्त केले.
पांढरा गुलमोहर
लेखिका : वसुंधरा घाणेकर
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन मूल्य : 250 रुपये
























































