
डॉ. विजया वाड,[email protected]
पुस्तकं… सुसंस्कृत जगण्याचा श्वास… अभिरुचीसंपन्न वाचकांसाठी दर आठवडय़ाला एक पुस्तक घेऊन येत आहेत.. डॉ. विजया वाड…
विजय ढवळे हे कॅनडानिवासी ,दंतशल्यचिकित्सक
हिंदुस्थानवर ‘हिंदुस्थानी’ प्रेम करतात. त्यांचे ‘वाघाचे पंजे’ हे पुस्तक शिवसेनेची सुवर्णमहोत्सवी वाटचाल अक्षरशः डोळय़ांपुढे उभी करते. ठाकरे कुटुंबात शाळकरी मुलगा असल्यापासून लेखकांचे येणेजाणे होते अन् बाळासाहेबांची कनिष्ठ भगिनी संजीवनी आणि धाकटे बंधू रमेश हे बालमोहनमधले विजयचे मित्र होते. बाळासाहेबांशी बोलणे या मित्रांमुळेच होई. मग विजयला बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये लिहायला प्रोत्साहन दिले.
सदर पुस्तक म्हणजे बाळासाहेबांचे कॅलिडोस्कोपिक चित्रण. खरे तर शिवसेना आणि बाळासाहेब फुलपानासारखे एकजीव होते. हे पुस्तक त्याच अभिन्न अंगाचा ज्वलंत इतिहास आहे. पुस्तकाची ‘वाचनीयता’ हे त्याच्या श्रेयाचे गमक आहे. ‘वाघाचे पंजे’ हे नावच किती समर्पक आहे ना?
या पुस्तकात ज्वालामुखीचा उद्रेक हे पहिलेच प्रकरण जबरदस्त झाले आहे. भगव्या झेंडय़ाची भगवी क्रांती, भगवे वादळ, शिवाजी पार्कवरील मोकळय़ा मैदानावरची भव्य सभा नि बाळासाहेबांचे ते वाक्य.. ‘‘आवाज उठवायचा तर तो असा जोरदार की, ऐकणाऱयाच्या कानठळय़ाच बसल्या पाहिजेत. जगाला कंठशोष करून सांगितले पाहिजे की, भूमिपुत्र या नात्याने असलेले हक्क परप्रांतीयांना हिरावून घेता येणार नाहीत म्हणजे नाहीत.’ त्या मेळाव्यात परप्रांतियांना केलेल्या विरोधाचे खंडन आचार्य अत्रे यांनी ‘मराठी’तून केले, पण डगमगतील तर ते बाळासाहेब कसले हो? शिवाजी
पार्कवरला मेळावा नेत्रदीपक होता. 1 जाने. 1967 रोजी त्याच ताकदीची सभा ठाण्याच्या गावदेवी मैदानात गाजली. ‘मराठी अस्मिता’ हा ब्रँड शिवसेनेने बनविला. बाळासाहेबांची रांगडी भाषा मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेत होती.
या पुस्तकातील ‘उपर नीचे-नीचे उपर’ हे चढउतार दाखविणारे प्रकरण विलक्षण वाचनीय झाले आहे, तर ‘अखेरची झुंज’ वाचताना डोळे ओलावले नाहीत असा वाचक शोधून सापडणार नाही. एका अलौकिक, असाधारण, उत्तुंग, लोभस व्यक्तिमत्त्वाची अखेर वाचताना जिवाची तगमग होते. प्रभावी कुंचला, जबरदस्त लेखणी आणि अमोघ वाणी हा ‘त्रिशूळ’ ज्यांनी जीवनभर विरोधकांवर चालवला तो नेता देशातील लाखो लोकांना शोकमग्न करून गेला. हे प्रकरण हा या सबंध वाचनीय पुस्तकाचा कळसाध्याय आहे.
कसे आहे मित्रांनो, अंतरी जे लिहितो त्या विषयाची तळमळ असायला हवी, तसेच जे काही मांडावयाचे त्या विषयाचे सखोल ज्ञान हवे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाच्या मांडणीत सुसूत्रता हवी. या तीनही निकषांवर ‘वाघाचे पंजे’ खरे उतरते हेच या सुंदर पुस्तकाचे यश. आपणाला माहिती पुरविणाऱया डॉ. मनोहर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत आणि दिवाकर रावते यांचे लेखकाने मनमोकळे आभार मानले आहेत.
मित्रांनो, ‘हे वाघाचे पंजे देती डरकाळीची हाक
म्हणती मर्द मराठय़ाला ती, दमात पाऊल टाक!
भिऊ नको तू, डरू नको तू, उभी समोरी वाट
चाल पुढे तू, उभा पाठीशी, हिंदुहृदयसम्राट’
असेच हे पुस्तक वाचून तुमचे मन नक्की म्हणेल बघा. अवश्य राचा, समृद्ध व्हा, मराठी असण्याचा अभिमान बाळगा. ‘जयहिंद! जय महाराष्ट्र!’ असे म्हणताना क्षणोक्षणी बाळासाहेबांना आठवा!
डॉ. विजय ढवळे यांचे ‘वाघाचे पंजे’ त्यास दिगंत कीर्ती मिळवून देईल असा विश्वास वाटतो. ‘नवचैतन्य’ने ते काढलेही आहे मोठय़ा झोकात यात शंकाच नाही.
वाघाचे पंजे – लेखक डॉ. विजय ढवळे
प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठs – 398, मूल्य – 370 रुपये
























































