रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खा, आजारांपासून दूर राहाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा बऱ्याच जणांना आवडतो. या दिवसांतलं गार गार वातावरण, सर्वत्र मनाला सुखावणारी हिरवळ यामुळे या दिवसांत मन प्रसन्न राहते, मात्र असे असले तरीही पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आजाराचा धोका टाळण्यासाठी खाणेपिणे, राहणीमान याबाबत काळजी घेणेही आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत. यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे, जाणून घेऊया.

तुळस
आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळशीचे महत्त्व फार आहे. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी तुळशीची पाने घालून केलेला चहा प्यावा. तुळशीच्या पानांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात.

आलं
आल्यामध्ये जिंजेरॉल, पॅराडोल्स, सेस्क्युटरपेन्स, शोगाओल्स आणि झिंगेरोन हे घटक भरपूर प्रमाणात असतात. आल्यामध्ये अँण्टिऑक्सिडेंटचे गुणधर्मही असतात. यामुळे ताप, सर्दी यासारखे आजार टाळता येतात.

काळीमिरी
काळीमिरीमध्ये पाइपरिन नावाचे घटक आढळतात. यामध्ये अँण्टीऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारात काळीमिरीचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

कढीपत्ता
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. संसर्ग टाळण्यासाठी कढीपत्ता गुणकारी आहे. कढीपत्त्यात अँण्टीबायोटिक आणि अँण्टीफंगल गुणधर्मही असतात. त्यामुळे या दिवसांत होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक असणारे हायपोग्लायसेमिक गुणही असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

लिंबू
लिंबूवर्गीय आंबट फळे खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. लिंबामध्ये जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. जीवनसत्त्व सी हे शक्तिशाली अँण्टीऑक्सिडंट आहे. यामुळे आजार टाळण्याकरिता या जीवनसत्त्वाची मदत होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत लिंबाप्रमाणेच इतरही आंबट फळांचा आहारात समावेश करावा.