‘हिंदुस्थानचा जावई’ पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी, मोदींनी केलं अभिनंदन

1518

ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये हुजूर पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या गळ्यात पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची माळ पडणार आहे. बोरिस जॉन्सन यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यामागे येथील हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

ब्रेक्झिटच्या तोंडावर ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यात बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. हुजूर पक्षाला 364 जागा मिळाल्या. या पक्षाला एकूण 43.6 टक्के मतं मिळाली. तर मजूर पक्षाने 203 जागा जिंकल्या. या पक्षाला 32.2 टक्के मतं मिळाली.

हिंदुस्थानशी नातं
बोरिस जॉन्सन हे पूर्व लंडनचे मेयर होते. त्यानंतर त्यांना परराष्ट्र मंत्री केले गेले आणि ब्रेग्झिटच्या मुद्द्यावर तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस पंतप्रधान झाले. बोरिस जॉन्सन यांची सध्याची पत्नी मरिना व्हीलर यांची आई दीप जन्माने हिंदुस्थानी शीख होती. हिंदुस्थानी मूळ असलेली पत्नी असल्याने आपल्याला हिंदुस्थानी मतं मिळावीत, असे बोरिस म्हणाले होते.

सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोरिस जॉन्सन हे आपले हिंदुस्थानचे विशेष नातं असल्याचे सांगत होते. आपण हिंदुस्थानचे जावई असल्याचे प्रचारही त्यांनी केला. तसेच बोरिस जॉन्सन यांना हिंदू समर्थक नेता मानले जाते. प्रचारादरम्यान त्यांना हिंदी गाणीही वाजवली होती. निवडणुकीमध्ये अर्थात त्यांना याचा फायदाही झाल्याचे दिसून आले. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकानी हुजूर पक्ष अर्थात बोरिस जॉन्सन यांना विजयी करण्यात मोठी भूमिका निभावली असल्याची चर्चा सुरू आहे.

मोदींनी केले अभिनंदन
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे. हिंदुस्थान- ब्रिटन संबंध आणखी घट्ट होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या