
बोरिवली स्टेशनला लागूनच असलेल्या ‘इंद्रप्रस्थ’ शॉपिंग सेंटरला रात्री ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच 14 फायर इंजिन, 13 जम्बो वॉटर टँकर आणि रोबोटसह अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. आग इतकी भयंकर होती की दुपारी 1 वाजता म्हणजेच तब्बल दहा तासांनी पूर्ण नियंत्रणात आली. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तब्बल 20 दुकाने जळून खाक झाली.
बोरिवली पश्चिमला स्वामी विवेकानंद मार्गावर ‘इंद्रप्रस्थ’ हा दोन मजली भव्य शॉपिंग मॉल आहे. यामध्ये कापड, इलेक्ट्रिकसह अनेक प्रकारची तब्बल 88 हून जास्त दुकाने या शॉपिंग सेंटरमध्ये आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे मार्चपासून हे शॉपिंग सेंटर बंदच आहे. मात्र या ठिकाणी रात्री 3 वाजताच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. हा प्रकार या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या ठिकाणची कपड्याची दुकाने, इलेक्ट्रिक दुकानांतील सामानामुळे आग वेगाने भडकत गेली. त्यामुळे काही वेळातच आग ‘लेव्हल-४’ची असल्याचे अग्निशमन दलाकडून जाहीर करण्यात आले. आठ ते दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आली. दरम्यान, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून चौकशी सुरू असल्याची माहिती उप मुख्य अग्निमशन दल अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी दिली.
अग्निशमन जवांनाच्या मदतीला रोबो
‘इंद्रप्रस्थ’ शॉपिंग सेंटरच्या दोन मजली इमारतीत कपड्यांची दुकाने जास्त असल्याने आगीसह प्रचंड मोठे धुराचे लोळ निर्माण झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना अडथळा येत होता. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने भिंत हटवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. धुरामुळे काही ठिकाणी जवानही जाऊ शकत नव्हते. या ठिकाणी रोबोटच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करण्यात आल्याचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.

























































