ऑफिसनंतर मेसेज, फोन करणाऱ्या बॉसला होणार दंड, आला नवा कायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
office-boss

ऑफिसच्या कामकाजाच्या वेळेनंतर (Office Hours) बॉस कडून कर्मचाऱ्याला फोन किंवा मेसेज करणं हे आता बेकायदेशीर असणार आहे. हा निर्णय अनेकांना आनंद देणारा असला तरी हा निर्णय आपल्या देशातील नाही, तर पोर्तुगालमध्ये यासंदर्भात कायदा बनवण्यात आला आहे. त्यानुसार ऑफिसच्या कामकाजाच्या वेळेआधी आणि कामकाजाची वेळ संपल्यानंतर कामासंदर्भात फोन, मेसेज, ई-मेल करणाऱ्या बॉसला आता शिक्षा होणार आहे.

‘डेली मेल’च्या रिपोर्ट नुसार, पोर्तुगलच्या संसदेत मंजूर करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार कंपन्यांनी ऑफिसच्या कामकाजाच्या वेळे आणि वेळ संपल्यानंतर किंवा सुटीच्या दिवशी कामकाजासंदर्भात फोन, मेसेज, ई-मेल केल्यास संबंधित कंपनीला दंड भरावा लागेल. कोविड-19 साथरोगाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये वर्क फ्रॉम होमला अधिकृतरित्या स्वीकारण्यात आलं. त्यानंतर अनेक कंपन्या निश्चित वेळेनंतरही कर्मचाऱ्यांना कामाचे बंधन घालत होत्या. त्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर सत्ताधारीपक्षानं येथे नवा श्रम कायदा (Labour Laws) आणला आहे.

या कायद्यानुसार वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वीज आणि इंटरनेट बिल देणं बंधनकारक असणार आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याचं मूल हे आठ वर्षांचे होईपर्यंत त्याला वर्क फ्रॉम होम करण्याची सूट देणं बंधनकारक असणार आहे. मात्र हा कायदा 10 किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या कंपन्यांना लागू नसेल.

पोर्तुगालचे श्रम आणि सामाजिक संरक्षण मंत्री Ana Mendes Godinho यांचं म्हणणं आहे की कोरोना साथरोगा दरम्यान वर्क फ्रॉम होमची आवश्यकता समोर आली आहे. त्यामुळे रिमोट वर्किंगला अधिक सोपे आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे बनवण्यासाठी नवा अध्यादेश आणण्यात आला.

अशा प्रकारचे कायदे यूरोपातील काही देशांमध्ये आधीच लागू करण्यात आले आहे. फ्रांस, जर्मनी, इटली आणि स्लोवाकिया मध्ये अशा प्रकारचे काही कायदे आहेत. पोर्तुगालमध्ये कर्मचारी आरोग्यदायी आणि स्वस्थ रहावे यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.