
किल्लारी येथील तेरणा नदीवरील जुना केटीबंधाऱ्यावर शुक्रवारी हातरगा येथील बापलेक गेले होते. त्यावेळी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्या मुलाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला.
किल्लारी जवळच आसलेल्या नदीहातरगा (ता. निलगा) येथील महेश रमेश सुर्यवंशी ( वय 18) आणि त्याचे वडील रमेश भाऊराव सुर्यवंशी हे शुक्रवारी जुने गाव किल्लारी येथील तेरणा नदीवरील केटी बंधारावर मासे पकडण्यासाठी गेला होते. मासे पकडण्याच्या नादात मुलाचा पाण्यात पाय घसरला आणि तो बुडाला. वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, जवळ कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. त्यांनी तातडीने ही घटना गावात कळवली.
गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहपोलीस निरीक्षक सुनील गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम भोळे घटनास्थळी पोहचले. त्यांनी निलंगा येथील अग्नीशामक दलालाही बोलवले. त्यामधील गंगाधार फरोडे, नागेश पूरी, अविनाश फुलारी, सोमनाथ माडोळे, दत्ता गायकवाड यांनी दिवस मावळेपर्यंत मुलाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह सापडला नाही. दुसऱ्या दिवसी ग्रामस्थांनी शोध घेत मुलाचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. किल्लारी पोलीस ठाण्यात या घटनेची आक्समिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.































































