लपाछपी खेळायला गेलेला मुलगा दुसऱ्या देशात सापडला

आपण सगळेच लहानपणी लपाछपीचा खेळ खेळलो आहोत. एखादा लपलेला भिडू गायब होणं आणि परस्पर त्याने घरी निघून जाणं देखील आपण अनुभवलेलं आहे. पण, एक मुलगा लपाछपी खेळण्याच्या नादात दुसऱ्या देशात सापडल्याची घटना घडली आहे.

या मुलाचं नाव हैदर फहिम असं असून तो 15 वर्षांचा आहे. बांगलादेशचा रहिवासी असलेला हैदर 11 जानेवारी रोजी मित्रांसोबत लपाछपी खेळत होता. त्याने लपण्यासाठी एका मोठ्या कंटेनरची मदत घेतली आणि त्यात जाऊन लपला. काही वेळाने त्याला तिथेच झोप लागली. पण, तो कंटेनर सामानाने भरलेला होता आणि त्याच दिवशी तो जहाजामार्गे मलेशियाला पाठवण्यात आला. सुमारे सहा दिवसांनी मलेशियातील एका बंदरावर हा कंटेनर उतरवण्यात आला. तिथे बंदरावरील कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्याचा कंटेनरमधून येणारा आवाज ऐकला आणि त्याची सुटका केली.

सहा दिवस अन्न पाणी न मिळाल्यामुळे हैदर अशक्त झाला होता. त्याला त्याची सुटका करणाऱ्यांची भाषाही ओळखता येत नव्हती. अखेर स्थानिक प्राधिकरणांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तो भीतीमुळे तापाने फणफणला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या मानवी तस्करीच्या शक्यतेला नकार दिला आहे.