ब्रम्हगाव, आष्टीत एकाच रात्री पाच घरफोड्या

611
ashti

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव आणि आष्टी शहरालगत असलेल्या ओमगुरूदेव सोसायटी येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील पवार वस्ती येथील शरद बबन पवार यांच्या घरात चोर शिरले व घरातील एक पेटी घेऊन पसार झाले. त्यानंतर ब्रम्हगाव बस स्टॅंड जवळ असलेल्या सुदाम शिंदे यांच्या घराकडे चोरांनी आपला मोर्चा वळवला तेथे चोर घरात शिरल्यानंतर घरातील लोक जागे झाले. चोरांनी त्यांना हत्याराचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र हे होत असताना घरातील लहान मुले जागे झाले व मोठ्या रडू लागले त्यामुळे चोरांनी येथून काढता पाय घेतला.

आष्टी- ब्रम्हगांव रोडवर गोरख देशमुख यांची विटभट्टी आणि घर आहे. येथे चोरट्यांनी घराचे दार उघडून घरात प्रवेश केला. व गोरख देशमुख यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच गोरख देशमुख यांना मारहाण करून त्यांच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. आम्ही रानच्या वस्तीवर राहतो त्यामुळे घरात पैसे ठेवत नसल्याचे सांगीतले परंतु चोरट्यांनी त्यांचे ऐकता घरातील कपाटाची उलथा-पालथ करून घरातील रोख रक्कम चोरून नेली. याच रस्त्यावर असलेल्या हजीपूर फाट्यावरील घुले वस्ती येथील बाबासाहेब घुले यांच्या घराच्या दारात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातीने सोन्याची दागिने चोरट्यांनी लंपास केले.

आष्टी शहराला लागून असलेल्या आष्टी – जामखेड रोडवरील ओम गुरूदेव सोसायटीतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे घर उघडून घरातील साहित्याची उलथा- पालथ केली. या पाचही घरफोडीच्या घटना रात्री दीड ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे. घरफोट्यांचा प्रवास मुगगाव- ब्रम्हगाव- आष्टी या रस्त्यावरून श्रृंगेरी देवीच्या पायथ्याशी असलेल्या पवार वस्तीपासुन सुरू झाला तो आष्टी शहरालगत असलेल्या जामखेड रोडवरील ओम गुरुदेव सोसायटीत संपला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घरफोड्यांमध्ये किती ऐवज लंपास झाला ते पोलीस तपासानंतरच उघड होईल. या घटनेचा तपास आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या