जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील 50 वर्षे जुना पूल कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात जायकवाडीच्या धरणाच्या डाव्या कालव्याजवळ सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. दुपारच्यावेळी दुर्घटना घडल्याने पुलावर रहदारी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. या पूलावर सकाळी आणि सायंकाळी जास्त रहदारी असते. दुपारची वेळ असल्याने रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या पूलाचे बांधकाम 1970 च्या दरम्यान करण्यात आले असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एकलहेरा व खापरदेव हिवरा गावातील शेतकऱ्यांना शेतात येण्या-जाण्यासाठी या पुल बांधण्यात आला होता. सध्या डाव्या कालव्यातून 1600 क्यूसेक क्षमतेने पाणी वाहत होत असून पूल कोसळल्याने कालव्याला कुठलाही धोका नसल्याचे जायकवाडी डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. पुलाच्या मध्यभागी आधारासाठी विटांच्या पिलरची पाण्याने झीज झाल्याने तो कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूल कोसळल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शाखा अभियंता डी.एन. चामे, कालवा निरीक्षक बाबासाहेब बोबडे, हेबारे आणि शेख लक्ष ठेवत आहेत.