
अलिबाग तालुक्यातील खानाव व वढाव या गावांना जोडणारा पूल आज रात्री अचानक कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटने काही वाहने अडकली असावीत असा संशय असून अग्निशमन दल, बचाव पथके व आपत्कालीन यंत्रणांनी धाव घेतली.
अलिबागपासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर हा पूल आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो जीर्ण झाला होता. वारंवार मागणी करूनही त्याची दुरुस्ती करण्याकडे टाळाटाळ केली गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आज रात्रीच्या सुमारास अचानक वाहतूक सुरू असतानाच हा पूल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बाजूला गाड्या अडकून पडल्या.
दोन्ही बाजूकडील वाहतूक तत्काळ बंद केली असून पुलाखाली कोणी अडकले नाही ना याची उशिरापर्यंत पाहणी सुरू होती. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.




























































