कर्ली खाडीवर १२ कोटी ५१ लाखाचा पूल मंजूर, २२ ऑक्टोंबरला भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून कुडाळ आणि मालवण तालुक्याला जोडणारा सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार रस्त्यावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कर्ली खाडीवर तब्बल १२ कोटी ५१ लाख ५९ हजार रुपयांचा पूल मंजूर झाला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून एवढे मोठे घेण्यात आलेले एकमेव पुल असून या कामाचे भूमिपूजन २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा. वराड जेटी येथे खा. विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी शिवसेना जिप सदस्य गटनेते नागेंद्र परब, जिप सदस्य हरी खोबरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, नेरूरपार आणि सुकळवाड कट्टा हे रस्ते वगळले तर कुडाळ आणि मालवण तालुक्याला कमी अंतरात जोडणारा रस्ता नव्हता. त्यामुळे सरंबळ सोनवडेपार हा रस्ता व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्षे ग्रामस्थानकडून होत होती. मात्र ता रस्त्याच्या मध्येच असलेल्या कर्ली खाडीवर मोठा पुल (ब्रिज) होणे आवश्यक होते. या पुलासाठी खासदार विनायक राऊत यांनी विशेष प्रयत्न करत सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार या रस्त्यावर प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेतुन कर्ली खाडीवर पूल मंजूर करून घेतला आहे. या पुलासाठ नाबार्डकडून १२ कोटी ५१ लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शासनाने या कामाची वर्क ऑर्डर दिली असून या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा. वराड जेटी येथे खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार सर्वात मोठा हा पुल आहे. हे पुल पूर्ण झाल्यावर कुडाळ आणि मालवण तालुक्यातील अंतर कमी होणार आहे असे सांगत या पुलाच्या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहनही आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरु असून त्यासाठी खासदार व पालकमंत्री पाठपुरावा करत आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले बस स्थानकाचे काम थांबले होते. मात्र आता ते सुरु असून ते महिन्याभारत पूर्ण होणार असे असेही आम. नाईक यांनी सांगितले.

नपचा प्रस्ताव थांबविण्याची ताकद काळसेकरांमध्ये नाही : आ. नाईक
जिल्हा मुख्यालयाच्या सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीचा प्रस्ताव आपण थांबवून ठेवला आहे असे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर सांगत आहेत. मात्र एखाद्या नगरपंचायतचा प्रस्ताव थांबविण्याची ताकद काळसेकरांमध्ये नाही, असे सांगत राज्यातील सर्व नपचे प्रस्ताव कर्मचाऱ्यांअभावी राज्य शासनाने थांबवून ठेवले असल्याचे स्पष्ट केले. तसेच निवडणूकांनंतर या नगरपंचायतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.