तब्बल 400 सिगारेट ओढणे एका 17 वर्षीय मुलीच्या जिवावर बेतले. मुलीचे फुप्फुस बंद पडले. त्याशिवाय तिच्या फुप्फुसात छिद्रदेखील पडले होते. सध्या तिची प्रकृती ठीक असून तिच्यावर पाच तासांची मोठी शस्त्रक्रिया पार पडली. याकाळात तिला हृदयविकाराचा झटका आल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले.
कायला ब्लिथ असे किशोरवयीन मुलीचे नाव आहे. 11 मे रोजी रात्री मित्राच्या घरी असताना कायला अचानक कोसळली. तिचे शरीर निळे झाले. तिला रुग्णालयात दाखल केले असता तपासणीदरम्यान तिच्या फुप्फुसातील ब्लेब नावाचा भाग खराब झाल्याचे आढळले.
या सगळय़ा प्रसंगाबद्दल कायलाचे वडील मार्क ब्लिथ म्हणाले, “हे सगळे भयानक होते. सिगारेटचे अतिसेवन कायलासाठी जीवघेणे ठरले. तिला हृदयविकाराचा झटका आला. एक क्षण तर तिला गमावेन असे वाटले.’’ शस्त्रक्रियेनंतर ते आता पूर्णवेळ कायलासोबत आहेत.
ऍक्शन ऑन स्मोकिंग ऍण्ड हेल्थ (एएसएच) नुसार, किशोरवयीन मुलांमध्ये सिगारेटची क्रेझ झपाटय़ाने वाढत आहे. 2023 मध्ये तर या ट्रेंडमध्ये जवळपास 20 टक्के वाढ झाली होती. एक चिंताजनक बाब म्हणजे पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेदेखील व्यसनाधीन होत आहेत.