ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. युरोपमधील काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे फ्रान्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. फ्रान्सपाठोपाठ आता ब्रिटननेही महिन्याभराच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पूर्ण ब्रिटनमध्ये चार आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 5 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत असेल. कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नसल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

आता लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना घरातच थांबावे लागेल. फक्त शिक्षण, काम, वैद्यकीय आणि अतिमहत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि घरातच थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल सामने सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांवर गेली आहे. तर आतापर्यंत 46 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 4.63 कोटींवर गेली आहे. तर युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक देशांची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू आहे.