
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजधानी दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका तरुणीवर दोन सख्ख्या भावांनीच अॅसिड हल्ला केला. बहिणीचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. अॅसिड हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपी भावांचा शोध घेत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे नाव सलमा (22) असे आहे. आरोपी भाऊन इरफान आणि रिजवान यांना शेजारी राहणाऱ्या लग्न झालेल्या व्यक्तीसोबत बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्यांनी तरुणीवर अॅसिड हल्ला केला. अॅसिड हल्ल्यामध्ये तरुणीचा चेहरा, गळा आणि छाती गंभीररित्या भाजली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आईने तिला सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केले तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस तिची स्थिती पाहून हादरून गेले.
पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर माझ्या अम्मीला बोलवा असे बोलत आहे. परंतु तिची आई तिला रुग्णालयामध्ये दाखल करून निघून गेली. आता येथील कर्मचारी आणि परिचारिका तिची काळजी घेत आहेत. पोलीसही तरुणीची काळजी घेत असून एक व्यक्ती तिच्यावर नजर ठेऊन आहे. पाच दिवसानंतरही तिची परिस्थिती गंभीर आहे. अॅसिड हल्ल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येऊ शकते असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
आईची-मुलीची भेट
मुलीला रुग्णालयामध्ये दाखल करून निघून गेलेल्या आईचा पोलिसांनी शोध घेतला आहे. पोलिसांनी आईची आणि मुलीची भेट घडवून आणली. याबाबत पीडितेच्या आईला विचारले असता, माझ्यामध्ये तिला या अवस्थेमध्ये पाहण्याची ताकद नव्हती, म्हणून मी तिला उपचारासाठी दाखल करून गेले, असे त्यांनी सांगितले. पीडितेच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना मदत करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
दिल्ली महिला आयोगाने घेतली दखल
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल दिल्ली महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या पथकाने मंगळवारी सलामाची भेट घेतली. परंतु तिला बोलताही येत नव्हते.
लवकरच अटक करण्यात येईल
दरम्यान, दोन्ही आरोपी नोएडा आणि बुलंदशहरमधील खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. दोन्ही आरोपींच्या लोकेशनचा पत्ता लावण्यात येत आहे. आरोपी नातेवाईकांकडे लपून बसले असण्याची शक्यता असल्याने छापेमारी होत आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
NCW has written to UP DGP OP Singh urging action be taken to enforce ban on the sale of acid in the state and detailed action taken report in the matter to the Commission at the earliest. A team of NCW to visit the victim today. https://t.co/E6cdVqqNuf
— ANI UP (@ANINewsUP) May 15, 2019



























































