राजकीय संन्यास घेऊ, पण भाजपसोबत जाणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayavati

राज्यसभा निवडणुकीतील राजकारणावरून भविष्यात मायावती भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर बसपा नेत्या मायावती यांनी, एकवेळ राजकीय संन्यास घेऊ, पण भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बसपाची विचारधारा ही भाजपच्या अगदी उलटी आहे. त्यामुळे भविष्यात विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत बसपा भाजपसोबत कधीही आघाडी करणार नाही, असे मायावती यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत मुस्लिम मतदार बसपापासून दूर जावा यासाठी समाजवादी पक्ष आणि कॉँग्रेसकडून षड्यंत्र रचले जात आहे. त्यासाठी बसपा भाजपसोबत असल्याचा अपप्रचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बसप जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. आमची विचारधारा ही सर्वजन धर्माची आहे. भाजपची विचारधारा याच्या उलट आहे. बसप जातीयवादी, धर्मवादी, भांडवलदारधार्जिणी विचारधारा असलेल्या पक्षासोबत कधीही आघाडी करणार नाही, उलट अशा पक्षाविरोधात सदैव लढणार, असे मायावती यांनी म्हटले आहे.

स्वार्थासाठी तडजोड नाही

बसप एक विचारधारा असलेला आणि आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष आहे. जेव्हा मी भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यावेळीदेखील मी कधी तडजोड केली नाही. स्वार्थासाठी विचारधारेच्या विरुद्ध कोणतेही काम केलेले नाही. माझ्या शासनकाळात कधीही हिंदू-मुस्लिम दंगा झालेला नाही, असे मायावती म्हणाल्या.