
सामना ऑनलाईन । लखनौ
ईव्हीएम मशीनवर चुकून बसपा ऐवजी भाजपला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चा अंगठा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलंदशहरमधील शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. पवन सिंह असे त्या तरुणाचे नाव असून तो अब्दुलापूर हुलासन गावात राहतो.
बुलंदशहर मतदारसंघातून बसपाने उमेदवार योगेश शर्मा यांना तिकीट दिले आहे तर त्यांच्याविरोधात भाजपने भोला सिंग यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात गुरुवारी मतदान झाले. त्यावेळी शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर पवन मतदान करायला आलेला. मतदान केंद्रात त्याने चुकून भाजपच्या चिन्हावर मत दिले. त्याच्या या चुकीमुळे तो एवढा वैतागला की त्याने मतदार केंद्राबाहेर येऊन स्वत:चा अंगठा कापला.

























































