कमी खर्चात परदेशात फिरायचंय? मग ‘हे’ देश ठरू शकतात उत्तम पर्याय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना परदेशात फिरण्याची इच्छा असते. देशाबाहेर पडावं आणि बाहेरच्या देशांमध्ये राहण्याचा अनुभव घ्यावा असं वाटलं तरी ते खिशाला परवडणारं असेलच असं नाही. पण, कमी खर्चातही परदेशवारी करता येईल अशा काही देशांचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत.

या देशांमध्ये फिरण्याचा, राहण्याचा तसंच प्रवासाचा खर्च कमी असून कमी खर्चात तुम्ही जास्त दिवस तिथे व्यतीत करू शकता. मुख्य म्हणजे यातील काही देश हिंदुस्थानच्या जवळचेच देश आहेत.

मलेशिया –
जगात सर्वाधिक फुलं जिथे उगवतात तो देश. ज्यांना वन्यजीवन, पर्वत, समुद्रकिनारे, वन्यप्राणी इत्यादींची आवड असेल, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. इथलं खाणंही अनेक पर्यटकांच्या आवडीचा विषय असतो.
फ्लाईटचं भाडं – मलेशियाला जाण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 हजार खर्च करावे लागतील. आधीच बुक केलंत तर ही रक्कम आणखी कमी होऊ शकते.
एक दिवसाचा खर्च – मलेशियात राहणे आणि खाणे यांचा एक दिवसाचा खर्च साडे तीन ते 5 हजार पर्यंत आहे.

कंबोडिया-
कंबोडियाला मंदिरांचा देश मानलं जातं. अंग्कोरवट मंदिर हे जगातलं एक प्रसिद्ध मंदिर असून इथे रोज हजारो पर्यटक भेट देतात. कंबोडियामध्ये तुम्ही राजसी जीवन, एका शांत बेटाचा अनुभव घेऊ शकता. कंबोडियाचं ग्रामीण जीवनही अनुभवण्यासारखं आहे.
फ्लाईटचं भाडं – कंबोडियाला जाण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये पडतील.
एक दिवसाचा खर्च – कंबोडियात राहणं, खाणं तुलनेने स्वस्त आहे. तिथे राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्याचा एक दिवसाचा खर्च फक्त 3 ते 5 हजार इतकाच आहे.

श्रीलंका –
देखणे समुद्र किनारे, हिरवाई यांची आवड असेल तर श्रीलंका हा एक स्वस्त पर्याय आहे. ऐतिहासिक ठिकाणं, हिल स्टेशन्स, मस्याहार यांच्याठी श्रीलंका प्रसिद्ध आहे.
फ्लाईटचं भाडं – श्रीलंकेत प्रवासासाठी तुम्हाला 10 ते 18 हजार इतका खर्च करावा लागेल.
एक दिवसाचा खर्च – श्रीलंकेत राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्याचा एक दिवसाचा खर्च फक्त दीड ते 2 हजार इतका आहे.

नेपाळ –
हिंदुस्थानचा शेजारी देश असलेला नेपाळ त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि हिमालयाच्या शिखरांसाठी ओळखला जातो. बौद्ध मठांना भेट देण्यासाठी देखील पर्यटकांची इथे रीघ असते.
फ्लाईटचं भाडं – नेपाळला जाण्यासाठी तुम्हाला 10 हजार ते 15 हजार रुपये खर्च करावे लागतील.
एक दिवसाचा खर्च – नेपाळमध्ये राहणे, खाणे आणि फिरणे यांचा एक दिवसाचा खर्च 2 ते अडीच हजार इतका आहे.

संयुक्त अरब अमिरात –
संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई हे हिंदुस्थानी पर्यटकांसाठी एक आवडीचं ठिकाण मानलं जातं. वाळवंटी प्रदेश, उंटाची स्वारी, ओमान खाडीत पोहणं, वाळवंटात कॅम्पिंग करणं, शॉपिंग इत्यादींसाठी युएई ही एक चांगली जागा आहे. दुबईतली बुर्ज खलिफा, अबुधाबी येथील संगमरवरी मशिदी आणि इतर इमारती पाहण्यासाठी इथे गर्दी होत असते.
फ्लाईटचं भाडं – युएईला जाण्यासाठी तुम्हाला फ्लाईटचं भाडं 14 ते 18 हजार रुपये इतकं पडू शकतं.
एक दिवसाचा खर्च – युएईमध्ये राहण्याचा आणि खाण्याचा तसंच फिरण्याचा एक दिवसाचा खर्च 5 ते 6 हजार रुपये इतका आहे.

सिंगापूर –
सिंगापूर हा देश त्यांची संस्कृती, कला आणि स्वादिष्ट खाण्यासाठी ओळखला जातो. कमी खर्चात फिरण्यासाठी सिंगापूर हा एक उत्तम देश आहे. सिंगापूरमध्ये कमी खर्चात उत्तम जेवण मिळतं. अनेक ऐतिहासिक ठिकाणं, निसर्गरम्य बेटं हे इथल्या आकर्षणाचं केंद्र आहे.
फ्लाईटचं भाडं – सिंगापूरसाठी तुम्हाला 17 ते 22 हजार इतका खर्च येऊ शकतो.
एक दिवसाचा खर्च – सिंगापूरमध्ये एका दिवसाचा राहणे, खाणे आणि फिरण्याचा एकूण खर्च 6 ते 7 हजार रुपये इतका येतो.

व्हिएतनाम –
व्हिएतनाममध्ये आशियातील सगळ्या मोठ्या गुंफा आहेत. बेटं, जंगलं, धार्मिक स्थळं आणि अनेक प्रेक्षणीय गोष्टींचा आनंद तुम्हाला व्हिएतनाममध्ये मिळू शकेल. येथील संगमरवराचे पर्वत हे विशेष आकर्षण आहेत. तसंच व्हिएतनामी स्ट्रीट फूड, राईस, न्यूडल्स सूप असे बरेच पदार्थ तुम्ही तिथे खाऊ शकता. इथल्या तरंगत्या बाजारात तुम्ही अनेक गोष्टी स्वस्तात खरेदी करू शकता.
फ्लाईटचं भाडं – व्हिएतनामला जाण्या-येण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये खर्च लागेल.
एक दिवसाचा खर्च – व्हिएतनाममध्ये एका दिवसाचा राहण्याचा-खाण्यापिण्याचा खर्च अडीच ते तीन हजार इतका आहे.

फिलीपाईन्स –
फिलीपाईन्समधील निसर्गरम्य बेटं ही पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात. तसंच, रात्री समुद्र किनाऱ्यावरील कॅम्पिंग, पर्वतांवर बाईकिंग, धबधबे इत्यादी पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठ्या प्रमाणावर येतात.
फ्लाईटचं भाडं – फिलीपाईन्सला येण्याजाण्यासाठी 24 हजारांहून पुढे फ्लाईट भाडं सुरू होतं. अन्य देशांच्या तुलनेने हे भाडं थोडं जास्त आहे.
एक दिवसाचा खर्च – फिलीपाईन्समध्ये राहणं, खाणं आणि फिरणं यासाठी फक्त अडीच ते 3 हजार रुपये खर्च करावे लागतात.