केबलचालकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बुलढाणा

केबलचालक केबलच्या माध्यमातून जनतेच्या मनोरंजनासाठी संपूर्ण देशभरातील जनतेपर्यंत चॅनेल्स पोहोचतात. याकामी आज देशभरात लाखो केबल ऑपरेटर लागलेले आहे. अतिशय कमी दरात केबल ऑपरेटर ही सेवा पोचवितात. मात्र केंद्र शासनाची संस्था ट्रायने एक निर्णय घेऊन ग्राहकांवर प्रचंड भुर्दंड लादला आहे. या निर्णयाविरोधात बुलढाण्यात सोमवार 24 रोजी जिल्ह्यातील शेकडो केबलचालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

मोर्चासाठी जिल्हाभरातील शेकडो केबल ऑपरेटर रेणुका मंगल कार्यालयात जमा झाले. तेथून दुपारी 1 वाजता हा मोर्चा निघाला. कारंजा चौक, जनता चौक, बाजार लाईन, कोर्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा दरम्यान केबल चालकांनी ट्राय तथा मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. बुलढाणा जिल्हा केबलचालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील जनतेला केवळ 200 ते 300 रुपयांमध्ये केबलसेवा सध्या दिली जात आहे. मात्र एमआरपीच्या नावाखाली ट्रायने निर्णय घेतला. या माध्यमातून भविष्यात केबल सेवा ही 400 ते 800 रुपयांपर्यंत वाढणार आहे. हा महागाईचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. त्यातून जनतेत प्रचंड रोष निर्माण होईल. त्यामुळे हा निर्ण तात्काळ रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

सिटी न्युजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ, गोपाल तुपकर, महेंद्र पाटील, ललीत इन्नानी, महेंद्र चौकसे, शाम तायडे, भिवसन ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो केबल ऑपरेटर सहभागी झाले हाते. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार विजयराज शिंदे, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, भारीप शहराध्यक्ष बाला राऊत, पंजाबराव गायकवाड यांनी आपला पाठिंबा दिला.