इमारत कोसळून एकाचा मृत्यू ; 4 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मस्जिद बंदरमधील म्हाडाच्या सय्यद या चार मजली इमारतीचे तोडकाम सुरू असताना ही इमारत अचानक कोसळली. त्यात ढिगाऱ्याखाली 5 कामगार अडकले होते. त्यातील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीला 3 ऑगस्ट रोजी आग लागली होती. त्यात तीन जण जखमी झाले होते.

ही इमारत जुनी असून धोकादायक असल्याने ती इमारत पाडून पुन्हा नवीन इमारत बांधण्यात येणार होती. 3 ऑगस्टला इमारतीचे पाडकाम सुरू असताना इमारतीमध्ये आग लागली. त्यावेळी आग विझवताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले होते. आज या इमारतीचे पुढील पाडकाम कंत्राटदाराकडून सुरू असताना संध्याकाळी ही इमारत पूर्णपणे कोसळली. ढिगाऱयाखाली अडकलेल्या 5 कामगारांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उर्वरित कामगारांवर उपचार सुरू आहे. या घटनेची अग्निशमन दल व पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे.