
धो धो पाऊस सुरू असताना अलिबागच्या उसरमध्ये एका वृद्धेला बेघर केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी आदेशानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेत जानकीबाई शिंदे यांना फरफटत घराबाहेर काढले. त्यानंतर जेसीबी लावून त्यांचे घर पाडण्यात आले. ४० वर्षांपूर्वीचे घर डोळ्यांदेखत भुईसपाट होताना जानकीबाई यांनी जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. मला बेघर करू नका असा आक्रोश त्यांनी केला. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही. या कारवाईनंतर येथील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे ५२ एकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. यामध्ये २८ एकर जागेत ५०० खाटांचे रुग्णालय आणि १०० जागांचे महाविद्यालय उभारले जाणार आहे, तर उर्वरित जागेत आयुर्वेदिक रुग्णालय व इतर आवश्यक इमारती प्रस्तावित आहेत. २०२२ साली कामाचे भूमिपूजन होऊन एकही वीट रचली गेली नाही. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची बाँड्री व शिंदे यांच्या मालकीच्या जागेच्या मधोमध जानकीबाई शिंदे यांचे घर उभे होते. सदर घर सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे घर महाविद्यालयाच्या कोणत्याही इमारतीच्या आड येत नव्हते, केवळ कुंपणाचे काम करताना घर मधे येत होते. असे असतानाही तातडीने सदर घर हटविण्याची कारवाई प्रशासनाने करीत वृद्ध महिलेला रस्त्यावर आणले.
कारवाईविरोधात संताप, सरकारचा निषेध
पावसाळ्यात कोणत्याही नागरिकाच्या राहत्या घरावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करू नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र सध्या अलिबाग तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. असे असतानाही जानकीबाई शिंदे या एका विधवा वृद्ध महिलेचे घर पाडण्याची कारवाई करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सरकार आणि अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे.