
संगमेश्वर तालुक्याचा खाडी भाग असलेल्या डिंगणी गावामधे दोन वर्षांपूर्वी एक बैल फुणगुस खाडीतून पुराच्या पाण्यामधून वाहुन आला होता. डिंगणीमधे आल्यावर त्याने डिंगणी मोहल्ला खालची बौद्ध वाडी येथे आश्रय घेतला. मात्र, तो कोणाच्याच गोठ्यात जायला तयार नव्हता. आता तो बैल मोठा झाला असून त्याने उग्र रूप धारण केले आहे. वाहनचालकांसह पादचारी आणि शेतकऱ्यांच्या अन्य जनावरांच्या मागे लागून तो पाठलाग करत असल्याने डिंगणी परिसर भितीच्या छायेखाली आहे. या बैलाचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी डिंगणीवासीयांनी केली आहे.
डिंगणी बागवाणीकोंड येथील शेतकरी गुरे चरण्यासाठी नदी किनारी जातात. बैलांना आणि शेतकऱ्यांना मारण्याचे काम हा बैल करत आहे. चार महिन्यांपूर्वी बागवानीकोंड मधील शेतकरी अशोक विश्राम बाचीम यांच्या एका बैलाचे त्याने एक शिंग मोडले आणि एका बैलाच्या डोळ्याला दुखापत केली. या झटापटीमधे अशोक बाचीम जखमी झाले होते. त्यानी तात्काळ डिंगणी ग्रामपंचायतीला कळवून या मोकाट बैलाचा बंदोबस्त करायला सांगितले. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
डिंगणी करजूवे रस्त्याने जी गाडी जाईल त्या गाडीचा पाठलाग करतो आणि मारण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या तावडीत सापडला , तर जीवाला धोका आहे हे निश्चित. त्यामुळे डिंगणी करजूवे रस्त्याने जात असाल तर सावधान. या बैलाचा बंदोबस्त झाला नाही , तर हा बैल इतर बैलांना जखमी करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याला जर लांब हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतो त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून या बैलाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.



























































