नेहरू, इंदिरा गांधींवर केलेलं अश्लील भाष्य भोवण्याची शक्यता, पायल रोहतगीविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अश्लील भाष्य केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणात राजस्थानच्या बुंदी न्यायालयाने आरोप सिद्ध होत असल्याचं म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणाची सुनावणी 18 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली असून त्या दिवशी साक्षीदारांनी दिलेल्या जबानीवरून निर्णय जाहीर करणार आहे.

पायल रोहतगी हिने चार वर्षांपूर्वी स्वातंत्र्य सेनानी पंडित मोतीलाल नेहरू, त्यांच्या पत्नी, जवाहरलाल नेहरू, त्यांच्या पत्नी कमला नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. त्या प्रकरणी 10 ऑक्टोबर 2019रोजी बुंदी येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. 15 डिसेंबर 2019 रोजी अहमदाबाद येथून पायल हिला अटक देखील करण्यात आली होती. तिला एक दिवसाची कोठडीही भोगावी लागली होती.

मंगळवारी बुंदी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. पायल हिनेच स्वतःचा पक्ष न्यायालयासमोर मांडला. तसंच, जी विधानं मी केली होती, ती माझी नसून आधीच कुणीतरी वेगळ्या व्यक्तिने लिहिलेल्या पुस्तकातील तो मजकूर होता, असा युक्तिवाद तिने केला. तो मजकूर आजही पुस्तक रुपात आणि गुगलवर दिसतो. तरीही माझ्याविरुद्ध निष्कारण खटला दाखल केला, असंही ती यावेळी म्हणाली. माझ्याऐवजी पुस्तकाच्या लेखकावर कारवाई होणं अपेक्षित आहे, असा युक्तिवाद पायलने केला. त्यानंतर न्यायालयात तिच्या व्हिडीओची क्लिप दाखवण्यात आली. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर न्यायालयाने कलम 504, 505 (2) आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये तिच्यावर आरोप निश्चित केले.