शहरातील चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
रवी जितेंद्र सरोदे (21, रा. नाना पेठ), मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण (24, रा. गणेश पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपुर्वी दुकानांचे शटर उचकटून चोरीचे सत्र कायम होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथकाची स्थापना करून तपासाला सुरूवात केली.
त्यावेळी वडारवाडीतील वाईन शॉपी फोडून चोरलेल्या पैशांतून मौजमजा करणारे गणेश पेठत असल्याची माहिती मद्यधुंद तारू, इरफान मोमीन आणि श्रीकांत वाघवले यांना मिळाली. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी गणेश पेठेत दोन दिवस तळ ठोकून रवीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी मंगेश चव्हाणला अटक केली. दोन्हीही आरोपी सराईत असून त्यांनी वडारवाडी, गोखलेनगर, सेनापती बापट रस्ता परिसरात दुकानांचे शटर उचकटून चोरी केल्याचे उघकीस आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, दिनेश गडांकुश, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, प्रकाश आव्हाड, आशिष निमसे, ज्ञानेश्वर मुळे, सुधीर माने, अमोल जगताप, तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.

























































